उटवद येथे चोरट्यांनी फोडले लग्नघर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 डिसेंबर 2019

रामनगर - जालना तालुक्‍यातील उटवद येथे चोरट्याने घरफोडी करून 11 लाख 41 हजार 620 रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना गुरुवारी (ता. 12) रात्री घडली. मौजपुरी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रामनगर - जालना तालुक्‍यातील उटवद येथे चोरट्याने घरफोडी करून 11 लाख 41 हजार 620 रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना गुरुवारी (ता. 12) रात्री घडली. मौजपुरी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

उटवद (ता. जालना) येथील शेतकरी दीपक भाऊराव शिंदे यांच्या मुलाच्या विवाहानिमित्ताने सर्व कुटुंबीय हे गुरुवारी (ता.12) बाहेरगावी गेले होते. या संधीचा फायदा घेत चोरट्याने घराच्या दरवाजाचे कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. लोखंडी तिजोरीचे कुलूप तोडून 11 लाख 41 हजार 620 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता.13) सकाळी निदर्शनास आली. परतूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. बांगर यांनी शुक्रवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दीपक शिंदे यांच्या तक्रारीवरून मौजपुरी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे करीत असल्याची माहिती ठाणे अंमलदार प्रमोदसिंग बायस यांनी दिली. 

हेही वाचा : बेपत्तांचा लागेना पोलिसांना पत्ता

जालन्यात साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास 
जालना शहरातील गवळीपुरा येथील अज्ञात चोरट्याने घरफोडीसह दुकानफोडी करीत तब्बल साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. हा प्रकार शुक्रवारी (ता.13) सकाळी उघडकीस आला. याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गवळीपुरा येथील आनंद वसंतलाल सांबरे (वय 44) हे त्यांच्या काकाच्या उपचारासाठी बाहेरगावी गेले होते. त्यामुळे त्यांच्या घरात कुलूप होते. चोरट्याने त्याच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला; तसेच त्यांच्या घराशेजारील दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून रोख एक लाख 13 हजार 500 रुपयांचे लंपास केले; तसेच सोन्याच्या चार अंगठ्या, सोन्याचे दोन रिंग असा साडेचार तोळे किमतीचा एक लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल, साडेतीन हजार रुपयांचे चांदीचे पैजण, रोख साडेतीन हजार रुपये असा एकूण तीन लाख 53 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. 
याप्रकरणी आनंद सांबरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. पोलिस उपनिरीक्षक श्री. चव्हाण अधिक तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft at Jalna district