esakal | औरंगाबाद : तासाभरात हिसकावले तीन मंगळसूत्र
sakal

बोलून बातमी शोधा

प्रतीकात्मक छायाचित्र.

आरडाओरड करूनही मदतीला धावले नाही कुणी, शहरात चोरट्यांचा धुमाकूळ 

औरंगाबाद : तासाभरात हिसकावले तीन मंगळसूत्र

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - शहरात दहीहंडीचा तगडा पोलिस बंदोबस्त, गस्त असताना शनिवारी (ता. 24) सकाळी चोरट्यांनी तीन महिलांचे मंगळसूत्र हिसकावल्याच्या घटना घडल्या. त्यापैकी दोन महिलांची मंगळसूत्रे चोरांच्या हाती लागली. तर एका महिलेचे मंगळसूत्र लहान असल्याने ते वाचले. भरदिवसा तासाभरात या घटना घडल्या. विषेश म्हणजे, चोरटे नागरिकांसमोर चेन स्नॅचिंग करताना कोणीही त्यांना अटकाव न केल्याने चोरटे सहज पसार होऊ शकल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. 
 
पहिली घटना : शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास पहिली घटना भानुदासनगरजवळ घडली. तनुजा विपुलचंद कंदी (48, रा. भानुदासनगर) या पतीसोबत आकाशवाणीहून घराकडे दुचाकीवर (एमएच- 20, बीएस- 3642) जात होत्या. यावेळी त्यांचा पाठलाग करीत दुचाकीवर मागे आलेल्या चोरांनी तनुजा यांचे अठरा ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावले. यावेळी तनुजा यांनी मंगळसूत्र हातात पकडून प्रतिकार केल्याने चोरांच्या हाती अकरा ग्रॅमचे सोने लागले. तर उर्वरित सात ग्रॅमची चेन तनुजा यांच्या हातात शिल्लक राहिली. घटनेनंतर त्यांनी जवाहरनगर पोलिसांत माहिती दिली. 
 
दुसरी घटना : दुसरी घटना सकाळी पावणेदहाच्या सुमारास सहकारनगरजवळील एसबीएच कॉलनीतील नाल्याच्या कॉर्नरवर घडली. जयश्री संदीप देवगावकर (44, रा. उल्कानगरी) या जागृती हायस्कूलमध्ये शिक्षिका आहेत. सकाळी मुलाला शाळेत सोडल्यानंतर त्या दुचाकीने (एमएच-20, एम-3568) घराकडे निघाल्या होत्या. यावेळी दुचाकीस्वारील दोन चोरांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. चोरांनी पहिल्यांदा मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तो फसल्याने चोरांनी पुन्हा पाठलाग सुरू केला. दुसऱ्या प्रयत्नात मात्र त्यांनी जयश्री यांना दुचाकीसह थांबवले. त्यांच्याजवळ दुचाकी नेत 17 ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावत धूम ठोकली. यावेळी त्यांनी आरडाओरड केली. मात्र, कोणी चोरट्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला नाही. या प्रकारानंतर त्यांनी उस्मानपुरा पोलिसांत तक्रार दिली. 
 
तिसरी घटना : तिसरी घटना साडेदहाच्या सुमारास सातारा परिसरात घडली. मनीषा अनिल सोमवंशी (रा. छत्रपतीनगर, सातारा परिसर) यांच्या पतीचे अय्यप्पा मंदिराजवळील धावडा कॉम्प्लेक्‍समध्ये इलेक्‍ट्रॉनिकचे दुकान आहे. पतीला कामात मदत करण्यासाठी पायी जात असताना दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांचे मंगळसूत्र हिसकावले. मात्र, दोन ग्रॅमचे मंगळसूत्र असल्याने चोरट्याच्या हाताला ते सहज लागले नाही. मंगळसूत्र तुटून खाली पडताच चोरांनी तेथून धूम ठोकली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी सातारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी धाव घेतली. तेव्हा उपस्थित तरुणांनी आपल्यासमोर चोरीचा प्रकार घडल्याचे सांगितले. मात्र, कोणीही चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला नाही. 
 
गुन्हे शाखेची 40 पथके गस्तीवर : गुन्हे शाखेची 40 पथके शहरात गस्तीवर असताना शहरात भरदिवसा चोरांचा धुमाकूळ सुरू आहे. चेन स्नॅचर्स, घरफोड्या आणि तोतयांनी सध्या पोलिसांना आव्हान दिलेले आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीदरम्यान पोलिस महासंचालकांनी शहरात आल्यावर पोलिस आयुक्तालयाने गुन्हेगारी रोखण्यासाठी गुन्हे शाखेची 40 पथके शहरात तैनात केल्याची माहिती दिली होती. मात्र, त्यांनी पाठ फिरवताच महिनाभरात पथके गायब झाली. 
 
महिनाभरातील घटना 

  • 3 ऑगस्ट - गुलमोहर कॉलनी, सिडको येथून संध्या सुभाष रापतवार या साठवर्षीय महिलेचे सायंकाळी साडेसातच्या सुमारास दुचाकीस्वार चोरांनी अडीच तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावले. 
  • 19 ऑगस्ट - गारखेडा परिसरातून कल्पना सुभाष भानुसे (48, रा. परिपूर्ती नर्सिंग होमजवळ, गारखेडा) या दुपारी पावणेबाराच्या सुमारास पायी जात होत्या. दुचाकीस्वाराने पावणेदोन तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. 
  •  20 ऑगस्ट - विद्यानगर भागात सविता नारायण कुलकर्णी (62, विद्यानगर, गारखेडा) या रात्री आठच्या सुमारास पायी जात असताना दुचाकीस्वारांनी त्यांचे 42 हजारांचे मंगळसूत्र हिसकावले. 
  •  21ऑगस्ट - मंगला रामेश्वर पुरोहित (50, रा. एन-11, हडको) या सकाळी साडेअकराच्या सुमारास महापालिकेच्या घंटागाडीत कचरा टाकण्यासाठी जाताना दुचाकीस्वाराने त्यांचे अडीच तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावत पोबारा केला. 
  • 21 ऑगस्ट - टीव्ही सेंटर भागात गायत्री लक्ष्मण गरुड (35, रा. सुजाता हाऊसिंग सोसायटी, जाधववाडी) या आलेल्या असताना दुचाकीस्वाराने त्यांचे 30 हजारांचे मंगळसूत्र हिसकावले. 
loading image
go to top