esakal | ‘या’ गावात भरपूर दूध, पण दुधाचा एकही थेंब विकला जात नाही
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

दुध घेण्यासाठी आलेल्यांना मोफत दुधाचे वाटप केले जाते. गायीचr रोज पुजा केल्याशिवाय शेतकरी घरा बाहेर पडत नाहीत. दरवर्षी कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी केली जाते.

‘या’ गावात भरपूर दूध, पण दुधाचा एकही थेंब विकला जात नाही

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : येहळेगाव गवळी (ता. कळमनुरी) येथील नंद गवळी समाजबांधवांनी दुध न विकण्याची परंपरा आजही कायम ठेवली आहे. गावात दोनशे गायी आहेत. मात्र दुधाची विक्री या गावात केली जात नाही. दुध घेण्यासाठी आलेल्यांना मोफत दुधाचे वाटप केले जाते. गायीचr रोज पुजा केल्याशिवाय शेतकरी घरा बाहेर पडत नाहीत. दरवर्षी कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी केली जाते. यावर्षी मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी (ता. ११) साजरी होणारी जन्माष्टमी मंदिरात केवळ पुजा करून घरोघरी साजरी केली जाणार आहे.

येहळेगाव गवळी हे तीन हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावात बहुतांश नागरिकांचा शेतीचा व्यवसाय आहे. प्रत्येकाकडे दुभती जनावरे आहेत. अंदाजे चारशे घरात प्रत्येकाकडे बैल व गाय आहे. शेतीला जोड व्यवसाय म्हणून जनावरे पाळण्याचा प्रघात आहे. मात्र येथे जनावरांचा उपयोग शेतीच्या कामासाठी व शेतीला लागणाऱ्या सेंद्रीय खतासाठी केला जातो. गावात कृष्णवंशीय समाजाचे नागरिक सर्वाधिक आहेत. कृष्ण हा नंद घराण्यातील असल्याचे मानले जाते. कृष्ण गोरक्षण करीत असे. नंद घराण्यात गोरक्षण केले जाते. मात्र दुधाची विक्रीचा व्यवसाय केला जात नसल्याची परंपरा आहे.

आबालवृद्ध रोज आहारात दुधाचा वापर करतात

ही परंपरा नंद घराण्यातील नवी पिढी आजही तंतोतंत पाळते. गावात गायीला पवित्र माणून तिची पुजा केली जाते. नैवेद्य देखील दिला जातो. गायीच्या दुधापासून दही, ताक, तुप केले जाते मात्र दुधाची विक्री केली जात नाही. घरातील आबालवृद्ध रोज आहारात दुधाचा वापर करतात. दुध न विकणारे गाव म्हणून हिंगोली जिल्ह्यात येहळेगाव गवळी या गावची वेगळी ओळख आहे.

हेही वाचा  नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या श्रीगणेश मंडळांसाठी काय आहेत सूचना ? वाचा...

कोरोना संकटामुळे हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले

दरवर्षी जन्माष्टमीला आगळा वेगळा उत्सव गावात साजरा केला जातो. या दिवशी लेक- जावयाला आमंत्रित केले जाते. गोकुळाष्टमीचा उपवास केला जातो. या दिवशी सर्व कामे बंद करून धार्मिक कार्यक्रमात सर्वजण सहभागी होतात. त्यानिमित्ताने कृष्ण मंदिरात पुजा, अभिषेक, भजन व कीर्तनाचा कार्यक्रम असतो. सकाळी पालखी निघते पालखीत गावातील सर्व नागिरक सहभागी होतात. सायंकाळी मंदिरात कृष्ण जन्माचा कार्यक्रम होतो. यावेळी महिलांचे भजन होते. रात्री बारा वाजता कृष्ण जन्माचे पाळणे सादर केले जातात. कीर्तन होते. त्यानंतर जन्माष्टमी साजरी केली जाते. मात्र यावर्षी कोरोना संकटामुळे हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याचे गावकरी सांगत आहेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमात गावातील मुस्लिम समाज बांधव देखील सहभागी होतात.

कामापुरते दुध मोफत दिले जाते

कृष्णाला मानणारा समाज म्हणून नंद गवळी समाज ओळखला जातो. त्यामुळे नंद घराण्यात दुधाची विक्री न करण्याची परंपरा आहे. ती आम्ही जपतो. गावात दुध घेण्यासाठी कोणी आले तर त्याला कोणत्याच घरी दुध विकत दिले जात नाही. कामापुरते दुध मोफत दिले जाते. जन्माष्टमीला मंदिरात विविध कार्यक्रम होतात मात्र यावर्षी कोरोना संकटामुळे हे कार्यक्रम रद्द करून घरोघरी जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे.
- संजय मंदाडे, गावकरी, येहळेगाव ता. कळमनुरी

संपादन - प्रल्हाद कांबळे