Republic Day2020 - नागरिकांमध्ये संविधानप्रती जनजागृती व्हावी- नवाब मलीक

फोटो
फोटो

परभणी : भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना समान अधिकार दिलेले आहेत. संविधानाशी बांधिलकी रहावी आणि नागरिकांमध्ये संविधानाप्रती जनजागृती निर्माण व्हावी हा हेतु समोर ठेवून आजपासुन ध्वजारोहण कार्यक्रमापुर्वी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात येणार आहे. तरी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी योग्य रितीने पार पाडल्यास लोकशाही बळकट होईल. असे प्रतिपादन अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी रविवारी केले.

प्रजासत्ताक दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते रविवारी (ता. २६) परभणी येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई विटेकर, महापौर अनिता रविंद्र सोनकांबळे, खासदार संजय जाधव, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार सुरेश वरपुडकर, आमदार मेघना बोर्डीकर- साकोरे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय, महापालिका आयुक्त रमेश पवार, आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

स्वातंत्र्याचा लाभ जनसामान्यांना व्हावा 

पुढे बोलतांना पालकमंत्री श्री.मलिक म्हणाले की, अनेक देशभक्तांच्या त्याग आणि बलिदानातून मिळालेल्या स्वातंत्र्याचा लाभ जनसामान्यांना व्हावा यासाठी व्रतस्थ होण्याचा हा दिवस आहे. आपल्या प्राणांची आहुती देवून शुर क्रांतीकारकांनी या देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी मोलाचे योगदान दिलेले विसरता येणार नाही. त्यांच्या बलिदानानेच आपण आज स्वातंत्र्याचा आनंद घेत आहोत. देशाने संविधानाचा स्विकार करुन लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात या दिवशी केली म्हणून आपण प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत आणि स्वातंत्र्याची फळे चाखत आहोत. तरी जात, धर्म, वंश, लिंग हे सर्व भेदभाव विसरुन एकसमानतेने सर्वांना समान संधी मिळवून देण्यासाठी अग्रेसर रहावे. प्रजासत्ताक दिन हा लोकशाहीचा उत्सव असून विविध प्रयत्नांमुळे आपली लोकशाही अधिकाधिक मजबुत होत आहे. या वर्षामध्ये व त्यापुढे होणाऱ्या सर्व निवडणूकांमध्ये सर्व मतदारांनी राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान करावे. असे आवाहन श्री.मलिक यांनी यावेळी केले.

परेड संचालनातून मानवंदना

यावेळी पोलिस दल, गृहरक्षक दल, एनसीसी, सैनिकी शाळा, बॉम्ब नाशक पथक,  अग्निशामक दल, रुग्णवाहिका, यांनी परेड संचालनातून मानवंदना दिली तसेच आरोग्य, कृषी, स्वच्छ भारत मिशन, महानगरपालिका, शिक्षण, ‘स्पर्श’ कुष्ठरोग निर्मूलन, महिला व बालविकास विभाग आदिंनी देखाव्यावर चित्ररथ सादर केले. यावेळी जिल्ह्यातील पोलिस दलात उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केलेले  पोलिस निरीक्षक व्ही.एस.आलेवार, पोलिस नाईक शंकर हाके व गजानन राठोड यांचा तसेच खेळाडू, पोलीस, कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री यांच्या हस्ते गौरव करण्यात आला तसेच शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

यावेळी पालकमंत्री श्री.मलिक यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, शहीदांच्या वीर माता व वीर पत्नी आणि ज्येष्ठ नागरिक, मान्यवरांची भेट घेवून शुभेच्छा दिल्या. या ध्वजारोहण समारंभास निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, डॉ.संजय कुंडेटकर, शिक्षणाधिकारी श्रीमती वंदना वाहुळ यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी- कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशासकीय इमारतीत प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न

प्रजासत्ताक दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त प्रशासकीय इमारतीत आयोजित करण्यात आलेल्या समारंभात अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्या हस्ते सकाळी साडेसात वाजता ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रशासकीय इमारत परिसरातील सर्व कार्यालय प्रमुख, अधिकारी- कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com