‘यांनाही’ मिळणार आता क्रेडीट कार्ड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

शेतकऱ्यांना किसान क्रेडीट योजनेंतर्गत बँकांमार्फत पुरेशा प्रमाणात व आवश्यक त्या वेळी एकाच कर्जखात्यामधून सुलभ व सोप्या कार्यपद्धतीद्वारे शेती व अनुषंगीक गरजांसाठी भांडवली कर्ज पुरवठा केला जात आहे. त्याचप्रमाणे किसान क्रेडीट कार्डद्वारे मत्स्य व्यवसाय व पशुसंवर्धन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना खेळते भांडवल उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

नांदेड : प्रधानमंत्री किसान योजनेत जिल्ह्यात चार लाख २० हजार १४१ शेतकरी पात्र ठरले आहेत. यातील पात्र व वंचित शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड उपलब्ध करुन देण्यासाठी बँक शाखास्तरावर मेळाव्याचे आयोजन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशीत केले आहे. 
 

भांडवली कर्ज पुरवठा
केंद्राच्या पी.एम. किसान योजनेद्वारे सर्व खातेदार शेतकऱ्यांना किसान क्रेडीट योजनेंतर्गत बँकांमार्फत पुरेशा प्रमाणात व आवश्यक त्या वेळी एकाच कर्जखात्यामधून सुलभ व सोप्या कार्यपद्धतीद्वारे शेती व अनुषंगीक गरजांसाठी भांडवली कर्ज पुरवठा केला जात आहे. त्याचप्रमाणे किसान क्रेडीट कार्डद्वारे मत्स्य व्यवसाय व पशुसंवर्धन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना खेळते भांडवल उपलब्ध करुन देण्यात येत आहे. परंतू अद्यापही अनेक शेतकरी किसान क्रेडीट कार्ड वाटप न झाल्यामुळे सुलभ कर्जाच्या सोयी सुविधा व फायद्यापासून वंचित असल्याचे केंद्र शासनाच्या निदर्शनास आले होते.

हेही वाचा....वाळू तस्करीच्या वादात तरुण शेतकऱ्याचा खून
 
मोहिमेत किसान क्रेडीट कार्ड वाटप 
जिल्ह्यातील सर्व बँकांनी ता. आठ फेब्रुवारी ते ता. २३ फेंब्रुवारी या पंधरवड्यात मोहिम राबवून किसान क्रेडीट कार्ड वाटप करावे अशा सूचना दिल्या आहेत. ज्या लाभार्थी शेतकऱ्यांकडे किसान क्रेडीट कार्ड आहेत, त्यांना आवश्यकतेनुसार मत्स्य व्यवसाय व पशुसंवर्धनासाठी वाढीव कर्ज मर्यादा मंजूर करणे, अक्रियाशील कार्ड असल्यास क्रियाशील करणेसाठी प्रोत्साहीत करणे तसेच कार्ड धारक शेतकऱ्यांना पंतप्रधान सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना यामध्ये सहभागासाठी प्रोत्साहीत करणे या बाबीचा देखील या मोहिमेत समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचलेच पाहिजे.... ‘बेटी बचाव- बेटी पढाओ’ अभियानाला नांदेडच्या पित्याची बळकटी

बॅंकांना सुविधा देण्याचे आदेश
मेळाव्यामध्ये बँकांनी पात्र शेतकऱ्याद्वारे एक पानी सुलभ अर्जाद्वारे माहिती घेणे व संबंधित तलाठी, महसूल अधिकारी यांनी मेळाव्यात उपस्थित राहून शेतकऱ्यांना आवश्यक ती कागदपत्रे उपलब्ध करुन देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे किसान क्रेडीट कार्ड वाटप व कर्जमागणी अर्जावर कार्यवाही करतांना शेतकऱ्यांना प्रक्रिया खर्च, कागदपत्राचा खर्च, तपासणी फी, इतर आकार तथा सेवाशुल्क बँकांनी माफ करणेबाबत देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत. 

दोन दिवस मेळाव्याचे आयोजन
जिल्ह्यात सोमवारी (ता. १७) व मंगळवारी (ता. १८) दोन दिवशी बँक शाखास्तरावर किसान क्रेडीट कार्ड वाटप मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड अद्यापपर्यत वाटप झालेले नाही, अशा सर्व पात्र शेतकरी लाभार्थ्यांनी सदर मेळाव्यास उपस्थित राहणेबाबत आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रवीण फडणीस यांनी केले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: They will get this credit card now, nanded news