esakal | बीड जिल्ह्यात बॅंक फोडण्याचा प्रयत्न, चोर परतले रिकाम्या हाताने
sakal

बोलून बातमी शोधा

1crime1_7

किल्लेधारूर तालुक्यातील तेलगाव येथील लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना परिसरात असलेल्या विजया बॅंकेत मंगळवारी (ता. १५) पहाटे चोरीचा प्रयत्न झाला. चोरांनी खिडकी तोडून आत प्रवेश केला; परंतु त्यांच्या हाती काहीच लागले नाही.

बीड जिल्ह्यात बॅंक फोडण्याचा प्रयत्न, चोर परतले रिकाम्या हाताने

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

किल्लेधारूर (जि.बीड) : तालुक्यातील तेलगाव येथील लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना परिसरात असलेल्या विजया बॅंकेत मंगळवारी (ता. १५) पहाटे चोरीचा प्रयत्न झाला. चोरांनी खिडकी तोडून आत प्रवेश केला; परंतु त्यांच्या हाती काहीच लागले नाही. मात्र बॅंकेचे आठ हजार रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी दिंद्रुड पोलिस ठाण्यात चोरांविरोधात गुन्हा नोंद झाला.


विजया बॅंकेत चोरीचा प्रकार झाल्याचे कारखान्याच्या सुरक्षारक्षकाच्या मंगळवारी सकाळी निदर्शनास आले. त्याने ही माहिती बॅंक कर्मचारी, अधिकाऱ्यांना दिली. त्यावरून बॅंकेचे शाखा व्यवस्थापक संदीप सावंत हे कर्मचाऱ्यासह बॅंकेत आले. त्यांनी लगेच दिंद्रुड पोलिसांना फोन करून चोरीच्या घटनेची माहिती दिली. माहिती मिळाल्यावरून दिंद्रुड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अनिल गव्हाणकर यांच्यासह पोलिस कर्मचारी भालेराव, पोलिस नाईक बालाजी सुरेवाड घटनास्थळी दाखल झाले.

तक्रारदाराने चकरा मारुन आत्महत्या केली, तेव्हा कुठे ‘माणूसकीलेस’ पोलिस जागे...

चोरांनी जी खिडकी तोडून आत प्रवेश केला, त्या खिडकीची पाहणी करून आतही पाहणी केली. बॅंकेतील तिजोरीला पहारीने ठोकल्याचे दिसून आले. आत असलेल्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे कनेक्शन तोडलेले होते; तसेच चोरी होताच वाजणाऱ्या सायरनचीही वायरही चोरांनी तोडल्याचे दिसून आले. याशिवाय तेथील लोखंडी रॅक वाकवून व कागदपत्रे अस्ताव्यस्त करून इतर किरकोळ नुकसान केले. यात आठ हजारांचे नुकसान झाले. चोरांच्या हाती बॅंकेतील रोकड आणि इतर मुद्देमाल लागला नाही. त्यामुळे मोठे नुकसान टळले. दरम्यान, पोलिसांनी ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते. सहायक पोलिस निरीक्षक अनिल गव्हाणकर तपास करीत आहेत.
 

संपादन - गणेश पिटेकर