Video - हजारो भाविकांनी घेतला भाजी-भाकरीचा प्रसाद

शशीकांत धानोरकर
गुरुवार, 16 जानेवारी 2020


पिंपळगाव संस्थानचे व्यंकट स्वामी, भोकर संस्थानचे उत्तमबन महाराज, बारालिंग देवस्थानचे रेवणसिद्ध कंठाळे महाराज यांच्या उपस्थितीत महाआरती झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रसाद वितरणाचे कार्य सुरू झाले. दर्शन व प्रसादासाठी स्वतंत्र रांगा होत्या. दोन्ही रांगांमध्ये स्त्री - पुरुषांची तोबा गर्दी होती. प्रसाद घेण्यासाठी दीड ते दोन तास लागत होता; पण हातात प्रसाद पडल्यानंतर आलेला थकवा दूर होऊन भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान बघायला मिळत होते.

तामसा, (ता. हदगाव, जि. नांदेड) ः तामसा येथील बारालिंग मंदिरात आगळ्यावेगळ्या भाजी -भाकर पंगतीला हजारो भाविकांनी हजेरी लावून मंदिर परिसर अध्यात्म व धार्मिक वातावरणात फुलल्याचे चित्र निर्माण झाले होते. येथील मंदिरातील ‘श्री’चा गाभारा विद्युत रोषणाई व फुलांनी आकर्षकरीत्या सजविला होता. 

हेही वाचा- ​गरीबांच्या गरजा पूर्ण करणारा बाजार : कोणता आणि कुठे आहे हा बाजार
सकाळी ‘श्री’चा अभिषेक झाल्यानंतर दुपारी महाआरती झाली. पहाटेपासूनच भाजी शिजविण्याचे काम दोन मोठ्या कढईमध्ये चालू झाले होते. यासाठी शेकडो तरुण झटत होते. सकाळपासून तामसा व परिसरातील अनेक गावांतून भाकरी येथे वाहनांद्वारे पोचविल्या जात होत्या. अनेक भाविकांनी आपल्या घरी श्रद्धेने बनविलेल्या भाकरी डोक्यावर किंवा पिशवीमध्ये टाकून आणल्या होत्या.

सकाळी अकरापासून मंदिराकडे जाणारा मुख्य रस्ता व शेतातील पायवाटा भाविकांनी व वाहनांनी भरल्या होत्या. दुपारी पिंपळगाव संस्थानचे व्यंकट स्वामी, भोकर संस्थानचे उत्तमबन महाराज, बारालिंग देवस्थानचे रेवणसिद्ध कंठाळे महाराज यांच्या उपस्थितीत महाआरती झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रसाद वितरणाचे कार्य सुरू झाले. 

स्त्री - पुरुषांची तोबा गर्दी 
दर्शन व प्रसादासाठी स्वतंत्र रांगा होत्या. दोन्ही रांगांमध्ये स्त्री - पुरुषांची तोबा गर्दी होती. प्रसाद घेण्यासाठी दीड ते दोन तास लागत होते; पण हातात प्रसाद पडल्यानंतर आलेला थकवा दूर होऊन भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान बघायला मिळत होते. प्रसाद वितरणाचे कार्य सात तास अव्याहतपणे चालू होते. ज्यामध्ये या वर्षी ६० हजारांवर भाविकांनी येथे उपस्थिती लावली होती. रात्री उशिरापर्यंत भाविकांच्या वाहनांचे येथे येणे चालू होते. मंदिर परिसरातील शेतामध्ये भाकरी-भाजीचा प्रसाद खाताना वनभोजनाचा अपूर्व आनंद मिळत होता. पंचक्रोशीतील अनेक शेतकऱ्यांनी कुटुंबासह बैलगाडीतून येथे येणे पसंत केले. भाजी-भाकर प्रसादाची चव व गोडी अप्रतिम असल्याच्या प्रतिक्रिया भाविकांनी दिल्या.  प्रसादासाठी मराठवाडा, विदर्भ, तेलंगणा, याशिवाय देशाच्या विविध भागांतून भाविक येथे आले होते. भाविकांच्या सोयीसाठी सामाजिक संस्थांनी पाण्याची व्यवस्था केली होती. यानिमित्ताने भरलेल्या जत्रेमध्ये बच्चे कंपनीने खरेदी व खेळण्याचा मोठा आनंद लुटला.

 

लोकप्रतिधींचीही उपस्थिती 
भाजी-भाकरीचा प्रसाद घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार जवळगावकर, खासदार हेमंत पाटील, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, हदगाव न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती सुनिता पैठणकर, माजी जिल्हाप्रमुख बाबूराव कदम कोहळीकर, ग्राहक संरक्षण परिषद सदस्य भागवत देवसरकर, गोदावरी अर्बनच्या अध्यक्षा राजश्री पाटील, जिल्हा परिषद सदस्य गजानन गंगासागर, ज्येष्ठ व्यापारी बालाजी अग्रवाल, उद्योजक शेखर औंधकर, पंचायत समिती सभापती महादाबाई तमलवाड, उपसभापती शंकर मेंडके, उपसभापती विशाल परभणकर, तहसीलदार जीवराज दापकर, गटविकास अधिकारी केशव गड्डापोड, डॉ. संजय पवार आदी मान्यवरांनी येथे उपस्थिती लावली होती. सहायक पोलिस निरीक्षक नामदेव मद्दे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांच्या चोख बंदोबस्त ठेवला होता. पंगतीच्या यशस्वितेसाठी देवस्थान समिती, तामशातील व्यापारी, विविध पक्ष, सेवाभावी, सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते, तरुण यांनी मोठे योगदान दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thousands of devotees took the vegetable and bread offerings