आंध्रप्रदेशातील तीन गुन्हेगारांना अटक; मुखेड पोलिसांची धाडसी कारवाई 

प्रल्हाद कांबळे
रविवार, 5 ऑगस्ट 2018

आंध्रप्रदेश पोलिसांनी भ्रमणध्वनीच्या लोकेशनद्वारे या आरोपींचा माग काढला असता हे आरोपी महाराष्ट्रातील मुखेड येथे असल्याचे समजले. त्यानंतर आंध्रप्रदेशचे चार पोलीस कर्मचारी मुखेडला आले आणि मुखेड पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली.

नांदेड : खून, दरोडा यासह आदी गंभीर दाखल असलेल्या फरार अट्टल तीन गुन्हेगारांना मुखेड पोलिस निरीक्षक सुभाष राठोड यांच्या पथकांनी मोठ्या शिताफीने पाठलाग करून पकडले. आंध्रप्रदेशातील एका खून प्रकरणातील दोन आरोपींना तसेच एका दरोड्यातील हे आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई रविवारी (ता. पाच) पहाटे केली. यावेळी पोलिसांच्या पथकावरच महिलांनी दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. 

आंध्रप्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात असलेल्या कल्याण दुर्गम येथील राहणारे आरोपी रवी गुरप्पा शिकारी (वय ४०) व श्रीकांत गोरप्पा शिकारी (वय १९) हे दोघे डिसेंबर २०१७ मध्ये सख्ख्या चुलत भावाचा खून करून फरार झाले होते. या प्रकरणी बदवेल पोलीस ठाणे यांनी या दोन आरोपींना खून प्रकरणी १७ जुलै २०१८ रोजी अटक करून आंध्रप्रदेश येथील धर्मावरम न्यायालयात हजर करण्यासाठी नेताना ते दोघेही पोलिसांना हिसका देऊन पळून गेले. तेव्हापासून हे दोन्ही आरोपी फरार होते. तसेच त्याचा एक साथीदार व्यंकटेश रविभोया शिकारी (वय २०) हाही दरोड्याच्या गुन्ह्यात फरार होता. श्रीकांत शिकारी याची सासरवाडी मुखेड येथील असल्याने ते गुन्हे आंध्रप्रदेश व तेलंगणामध्ये करून मुखेडात वास्तव्य करत होते. 

आंध्रप्रदेश पोलिसांनी भ्रमणध्वनीच्या लोकेशनद्वारे या आरोपींचा माग काढला असता हे आरोपी महाराष्ट्रातील मुखेड येथे असल्याचे समजले. त्यानंतर आंध्रप्रदेशचे चार पोलीस कर्मचारी मुखेडला आले आणि मुखेड पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. मुखेड ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांनी सापळा रचून आरोपी थांबलेल्या ठिकाणी पाहणी केली. या पाहणीत आरोपी त्याच ठिकाणी वास्तव्य करत असल्याचं त्यांना आढळलं. या आरोपींना पोलीस मागावर असल्याची चाहूल लागताच रविवारी सकाळी साडेसात वाजता त्यांनी कुटुंबासह पळ काढला.

आरोपी फरार होत असल्याची चाहुल लागताच मुखेड आणि आंध्र पोलिसांनी या खून प्रकरणातील आरोपींना पाठलाग करून पकडल. या प्रकरणातला तिसरा आरोपी व्यंकटेश साई यालाही पकडण्यात आले. हा एका दरोड्यातील आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या महिलांनी पोलिसांवर दगडफेक केली. सदरील आरोपी हे अट्टल गुन्हेगार असून, त्यांच्याकडून मोठे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three criminals arrested in Andhra Pradesh The action of the Mukhed Police