ऑटोमोबाईलच्या दुकानात तीन लाखांचा गांजा, लातूर जिल्ह्यातील मुरूडमध्ये तिघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 December 2020

मुरूड (ता.लातुर) येथील एका ऑटोमोबाईलच्या दुकानावर शनिवारी (ता. १९) पहाटे पोलिसांनी छापा टाकून ५१ किलो गांजासह तिघांना अटक केली आहे.

लातूर : मुरूड (ता.लातुर) येथील एका ऑटोमोबाईलच्या दुकानावर शनिवारी (ता. १९) पहाटे पोलिसांनी छापा टाकून ५१ किलो गांजासह तिघांना अटक केली आहे. उपविभागीय अधिकारी सचिन सांगळे यांच्या विशेष पथकासह मुरूड व गातेगाव पोलिस तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे मुरूड येथे खळबळ उडाली आहे. मुरूडचे सहायक पोलिस निरीक्षक महादेव गोमारे), गातेगावचे सहायक पोलिस निरीक्षक विलास नवले व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक आर. जी. राठोड यांच्या संयुक्त पथकाला मुरूड येथील मुरूड ते लातूर रस्त्यावरील ओमसाईराज ऑटोमोबाईल्स या दुकानात गांजा असल्याची माहिती मिळाली.

 

 

त्यावरून पथकाने शनिवारी पहाटे तीन वाजता या दुकानावर छापा टाकला. छाप्यात तीन पोत्यांमध्ये तीन लाख सहा हजार रूपये किंमतीचा ५१ किलो बी मिश्रीत गांजा आढळून आला. या गांजासह व त्याच्या वाहतुकीसाठी वापरलेली स्कॉर्पिओ व मिनी व्हॅन ही दोन वाहने पोलिसांनी जप्त केली. दुकानाचे मालक गोविंद दिगांबर खोसे (वय ३५, रा. माटेफळ, ता. लातूर) याला गांजाबाबत विचारणा केल्यानंतर त्याने युवराज तात्याराव काळे (वय ३०, रा. दत्तनगर, मुरूड) व सुनिल रोहिदास शिंदे (वय २३, रा. मांडवा, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) हे दोघे बाहेरगावाहून मिनी व्हॅनमधून (एमएच २५ एएल ९०१४) गांजा घेऊन आल्याचे सांगितले.

 

 

त्यानंतर हे दोघे आवश्यकतेनुसार माझ्या मालकीच्या स्कॉर्पिओमधून (एमएच ०४ बीएन ५७१५) हा गांजा लातूर येथे नेऊन विक्री करतात, अशी माहिती खोसे यांनी पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी गोविंद खोसे याच्यासह युवराज काळे व सुनिल शिंदे यांना अटक केली. या प्रकरणी मुरूड पोलिस ठाण्यात तिघांविरूद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम वीसनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे पुढील तपास करत आहेत.

 

संपादन - गणेश पिटेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three Lakh Marijuana Seized Latur News