
मंत्रिमंडळ विस्तारात लातूरला ठेंगा
लातूर - राज्यात राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या लातूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे तीन आमदार आहेत. असे असताना देखील शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात एकाही आमदाराला स्थान दिले नाही. भारतीय जनता पक्षाने लातूरकरांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. पक्ष नेतृत्वाने जिल्ह्याच्या नेत्यांकडे वक्रदृष्टी दाखवल्याने कार्यकर्त्यात नाराजी आहे. तर जिल्ह्यातील अंतर्गत गटबाजीचा हा परिणाम आहे, असेही पक्षाच्या वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या दुसऱ्या टप्प्यात तर लातूरला स्थान दिले जाणार का? याकडे लक्ष लागले आहे.
लातूर जिल्हा राजकीय दृष्ट्या महत्वाचा आहे. काँग्रेस असो किंवा भारतीय जनता पक्षाची सत्ता असो लातूर जिल्ह्याला प्रतिनिधीत्व मिळालेले आहे. त्यात माजीमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वेळेस लढल्या गेलेल्या प्रत्येक निवडणुकीत लातूरकरांनी भारतीय जनता पक्षाला भरभरून यश दिले. लातूरने सुधाकर शृंगारे यांच्या रुपाने खासदार दिला. जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समित्या, नगरपालिकाही भाजपचे वर्चस्व राहिले. लातूरकर सातत्याने भाजपच्या पाठिशी राहिले. हे दिसून येत होते. असे असताना भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व मात्र लातूरकडे सातत्याने वक्रदृष्टी ठेवून असल्याचे दिसत आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात देखील पहिल्या टप्प्यात लातूरला डावललेले गेले. दुसऱ्या टप्प्यात मात्र आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांची मंत्री म्हणून वर्णी लागली.
सध्या जिल्ह्यात आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार आणि आमदार रमेश कराड हे तीन आमदार भाजपचे आहेत. तीघा पैकी एकाची तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात वर्णी लागले असे पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटत होते. आपल्याच नेत्याचा नंबर लागणार असा दावाही आमदारांचे समर्थक करताना दिसत होते. पण प्रत्यक्षात मात्र पक्षश्रेष्ठींनी लातूरला ठेंगा दाखवला आहे. एकाही आमदाराला मंत्रिमंडळात स्थान दिले नाही. दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात तरी लातूरला स्थान मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गटबाजीचा परिणाम
लातूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षातील गटबाजी सर्वश्रूत आहे. त्याचा हा परिणाम असल्याची चर्चा आता कार्यकर्ते करु लागले आहेत. पण यात पक्षश्रेष्ठींनी लातूरवर अन्याय केल्याचीही भावना आहे. खरे तर श्री. निलंगेकर यांच्याकडे मराठवाड्याचे नेतृत्व म्हणून पाहिले जाते. त्यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. तसेच आमदार अभिमन्यू पवार हे श्री. फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रीपद मिळेल असे त्यांच्या समर्थकाना वाटत होते. श्री. निलंगेकर व श्री. पवार यांचा पत्ता कट झाला तर तर आमदार रमेश कराड यांच्या पदरात मंत्रीपद पडेल अशी चर्चाही सुरु होती. पण पक्षश्रेष्ठीनी मात्र लातूरलाच ठेंगा दाखवला आहे.