‘प्रेमी युगुलां’च्या प्रेमाला आज येणार बहर

शिवचरण वावळे
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

आता प्रतीक्षा संपली; प्रेमी युगुलांना फेब्रुवारी महिना सुरू झाल्यापासून ‘व्हॅलेंटाईन डे’ची चाहूल लागलते. प्रेमी युगुलांनी एकमेकांना मनोमन आपले मानत भेटवस्तू देण्यास सुरवात केली आहे. पण, आज तिचा - त्याचा होकार मिळविण्याचा व हक्काने प्रेम व्यक्त करण्याचा हक्काचा दिवस...त्यामुळे आजच्या दिवशी प्रेमी युगुलांच्या प्रेमाला बहर आला नाही तर नवलच..!

नांदेड : फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सात तारखेला येतो ‘रोज डे’ दुसऱ्यादिवशी ‘प्रपोज डे’, तीसऱ्या दिवशी ‘चॅकलेट डे’ आणि पुढे पाच दिवसांच्या अंतराने ‘व्हॅलेंटाईन डे’ असे प्रेमापर्यंत घेऊन जाण्याची मध्यस्ती करणारा हा फेब्रुवारी महिना. हा महिना येताच प्रेमी युगुलांच्या आनंदाला जणू भरतीच आलेली असते. प्रेम व्यक्त करण्यासाठी जीवनाच्या बागेत अलगद उमललेले फूल म्हणजे ‘प्रेम’. असे प्रेम अभिव्यक्त करायला शब्द सूचत नाहीत. तेव्हा देहबोलीतूनच ‘ती’ किंवा ‘तो’ मनात फुलणारे प्रेम व्यक्त करतात. असेच अनेकांना आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी संधी आजच्या ‘व्हॅलेंटाईन डे’ला उपलब्ध करून दिली आहे. तेव्हा तुम्ही कसे व्यक्त करणार तुमच्या मनातले प्रेम तिच्याजवळ, त्याच्याजवळ..?

बाजारपेठ आहे तुमच्या मदतीला
प्रेमभावना व्यक्त करण्याच्या प्रत्येकाच्या मनात वेगळ्या कल्पना असतात. तेव्हा तुम्ही दुसऱ्यांकडून किती प्रेमाच्या युक्त्या शिकून घेतल्या असल्या तरी त्या सर्वच युक्ती, कल्पना तुमच्या उपयोगी पडतीलच असे नाही. तेव्हा तुमचे प्रेम व्यक्त करण्याची कल्पना ही इतरांपेक्षा वेगळीच असेल. यासाठी तुम्हाला बाजारपेठेतील सजलेली ग्रिटिंग शॉप, फुलांची बाजारपेठ नक्कीच तुमची मदत करू शकेल. तुमच्या प्रेमाच्या उत्सवाला अजून रंगतदार करण्यासाठी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पूर्वसंध्येला बाजारपेठत विविध रंगांची फुले आल्याने बाजारपेठ जणू फुलांच्या रंगांनी न्हाऊन गेली आहे. शिर्डी, नगर, पुणे येथील विविध नावांनी प्रसिद्ध असलेल्या गुलाबांची आकर्षक, देखणी, टपोर, नाजुक, कोमल अशी कमी प्रमाणात का होईना फुले उपलब्ध झाली आहेत.

ऑनलाइन संदेशातून प्रेमाचा धागा दृढ
संध्याकाळ होता होता प्रेमीयुगलांची पावलेदेखील ग्रिटिंग कार्ड, विशेष गिफ्ट, फुले खरेदी करण्यासाठी बाजाराकडे वळत होती. मुला - मुलींच्या हातात स्मार्टफोन आल्याने प्रेम व्यक्त करण्याच्या संकल्पना काहीशा बदलल्या असल्या तरी सोशल मीडियाच्या युगातही ग्रिटिंगचे आकर्षण कायम आहे. बाजारातील प्रेमपत्रांनी आपले स्थान टिकवून ठेवले होते. मात्र, आता हायटेक युगात सोशल मीडियाचा वापर होत आहे. सोशल मीडियावरून प्रेम व्यक्त करण्यात येत आहे. ऑनलाइनने मस्त डिझाइन केलेल्या संदेशातून प्रेमाचा धागा दृढ केला जात आहे.

हेही वाचा - मध्यप्रदेशच्या तरुणाने का ठेचला नांदेडचा तरुण....

ग्रिटिंग, भेटवस्तूंची क्रेझ कायम
रंगबेरंगी फुलं, चॉकलेट्स, आकर्षक भेटवस्तू या तरुणाईला भावतात नवीन मॅझिक मिरची भुरळ प्रेमवीरांना पडत आहे. दीडशे रुपयांपासून ते आडीच हजार रुपयांपर्यंतचे टेडी विक्रीस आले आहेत. तर पन्नास रुपयांपासून ते बाराशे रुपयांपर्यंतचे ग्रिटिंगही उपलब्ध आहेत. यंदाच्या व्हॅलेंटाईनसाठी मनाला भावणारे विविध आकाराचे चॉकलेट्स आकर्षक पॅकमध्ये आल्याने तरुणाईच्या पसंतीला उतरले आहे. वेगवेगळ्या इमोजी आणि हार्ट आकारातल्या चॉकलेट्सला पसंती मिळत आहे. किचन, लव्ह स्टोरी बुक यांनाही मागणी आहे.

‘डच’ गुलाब दाखल
‘व्हॅलेंटाईन डे’च्या सप्ताहात गुलाबाला मोठी मागणी असते. खास ‘रोझ डे’ आणि शेवटचा ‘व्हॅलेंटाईन’ या दिवशीची वाढती मागणी लक्षात घेऊन जास्तीचे गुलाब पुण्याहून मागविले आहेत. यंदाही डच या प्रकारातील गुलाब बाजारात दाखल झाले आहेत. ३० रुपये नग या प्रमाणे गुलाब मिळत आहेत.

हेही वाचलेच पाहिजे - खळबळजनक...नांदेडच्या ‘या’ डॉक्टरला खंडणीची धमकी

ग्रिटिंग देण्याची क्रेझ कायम
सध्या सोशल मीडियामुळे प्रेम व्यक्त करणे सोपे झाले आहे. तरीही ‘व्हॅलेंटाईन डे’साठी ग्रिटिंग देण्याची क्रेझ कायम आहे. शब्दरूपी ग्रिटिंग आणि सोबत चॉकलेट्स अथवा टेडी भेट देण्याची पंरपरा आजही प्रियकर, प्रेयसी जपतात. हल्ली समाजात प्रेमाविषयी न्यूनगगंड तयार झाला असून ‘प्रेम’ नावालाच माणसे नाव ठेवत आहेत. एखाद्या मुलीला मोहात टाकणे व फूस लावून पळवून नेणे या अर्थाने सुद्धा प्रेमाकडे बघितले जात आहे. प्रेम करणे म्हणजे एखाद्याची फसवणूक करणे असे गृहीत धरले जात आहे. पण; खरे पाहता प्रेमाला कुठल्याही वयाची, पैशाची, धन दौलतीची वा जातीची मर्यादा नसते. एखाद्याविषयी दाखवलेली सहानुभूती, आदर, दृढ विश्वास म्हणजे प्रेमच होय.

प्रेमाला समजून घ्या
समाजात प्रेमाबद्दल असलेले गैरसमज दूर व्हायला हवेत. एकमेकावर मनापासून प्रेम प्रकरणाऱ्या प्रेमी युगुलांना आजही प्रेमासाठी सत्वपरीक्षा द्यावी लागत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. अनेक वेळा तर नवयुवक, युवती अडचणीत येत असून यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कधी कधी पुढच्या व्यक्तीला आपल्यावर कुणीतरी प्रेम करतय याची जाणीवही नसते. पण, याच एकतर्फी प्रेमातून त्या व्यक्तीला समाजातून अनेक वाईट गोष्टी अचानक कानावर येतात. या गोष्टी मनावर घेऊन तो व्यक्ती स्वतःच्या जिवाचे बरे- वाईट करून घेतो. काही हळव्या मनाची व्यक्ती यात आत्महत्येसारख्या शेवटच्या टप्प्याचाही अवलंब करतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Today The Love Of Lloving Couples Will Come Nanded News