आज होणार उदगीर पंचायत समितीच्या नव्या सभापतीची निवड

युवराज धोतरे
Tuesday, 8 September 2020

उदगीर येथील पंचायत समितीच्या अविश्वास ठरावामुळे रिक्त झालेल्या सभापती पदाची निवड मंगळवारी (ता.आठ) होणार आहे. त्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

उदगीर (जि.लातूर) : उदगीर येथील पंचायत समितीच्या अविश्वास ठरावामुळे रिक्त झालेल्या सभापती पदाची निवड मंगळवारी (ता.आठ) होणार आहे. त्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. येथील पंचायत समितीच्या सभापती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपच्या काही सदस्यांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. त्या संदर्भात ता.२८ ऑगस्ट रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत अकराविरुद्ध तीन मतांने हा अविश्वास ठराव मंजूर झाला होता.

उदगीरचे पंचायत समिती पद हे खुल्या प्रवर्गासाठी आहे. ता.३० डिसेंबर २०१९ रोजी पंचायत समितीच्या सभागृहात सभापती व उपसभापती यांची निवड झाली होती. १४ सदस्य असलेल्या पंचायत समितीमध्ये भाजप नऊ, काँग्रेस तीन तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक असे पक्षीय बलाबल आहे. ३० डिसेंबर रोजी झालेल्या निवड प्रक्रियेत सभापती, उपसभापती यांना भाजप व महाआघाडीला समसमान प्रत्येकी सात मते मिळाली होती. त्यामुळे चिठ्ठीद्वारे सभापती, उपसभापतीची निवड करण्यात आली होती. त्यात सभापतीपदी भाजपचे विजय पाटील, तर उपसभापती काँग्रेसचे बाळासाहेब मरलापल्ले यांची निवड झाली होती.

लातुरात शिवभोजन थाळीची पार्सल सेवा जोरात,सव्वातीन लाख जणांची भागवली भूक

मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना महाआघाडीच्या वतीने शुक्रवारी ता.१९ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी प्राधिकृत अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांची निवड करून शुक्रवारी विशेष सभेचे आयोजन करून विश्वास मत घेण्याचे निर्देशीत केले होते. या ठरावावर दुपारी पंचायत समितीच्या सभागृहात चर्चा झाली त्यानंतर घेण्यात आलेल्या मतदानात अकरा विरुद्ध तीन मताने ठराव मंजूर झाला यात भाजपाचे सहा मते फुटली आहेत. या अविश्वास ठरावामुळे उदगीरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून घडामोडींना वेग आला आहे. याचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस करत असून सभापतिपदाची संधी ही राष्ट्रवादीला मिळणार असल्याची चर्चा आहे. या निवड प्रक्रियेसाठी पीठासन अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी हे काम पाहणार असून या बैठकीत कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सभापती मुळे यांची निवड निश्चित
उदगीर पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव सदस्य प्रा.शिवाजी मुळे यांची निवड निश्‍चित मानली जात आहे. काँग्रेस तीन, शिवसेना एक तर भाजपच्या सहा सदस्यांचा त्यांना पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांची निवड होणार असल्याचे दिसून येत आहे.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Today Udgir Panchayat Samiti's Chairman Election