esakal | लातूर जिल्ह्यातील नव्वद टक्के शाळा उद्या सुरू होणार
sakal

बोलून बातमी शोधा

3school_180

लातूर  जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. मात्र दहा टक्के शाळा सुरू करण्यासाठी शिक्षकांच्या कोरोना तपासणीची अडचण आली आहे. त्यामुळे नव्वद टक्के शाळा सोमवारी सुरू होणार आहेत.

लातूर जिल्ह्यातील नव्वद टक्के शाळा उद्या सुरू होणार

sakal_logo
By
विकास गाढवे

लातूर : जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. मात्र दहा टक्के शाळा सुरू करण्यासाठी शिक्षकांच्या कोरोना तपासणीची अडचण आली आहे. त्यामुळे नव्वद टक्के शाळा सोमवारी सुरू होणार आहेत. उर्वरित दहा टक्के शाळा तीन दिवसांनी उशिरा म्हणजे २६ नोव्हेंबर सुरू करण्याचे प्रशासनाचा प्रस्ताव आहे.
राज्य सरकारने सोमवार पासून (ता. २३) माध्यमिक शाळांतील नववी व दहावी तर उच्च माध्यमिक विद्यालयांतील अकरावी व बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेऊन अंतिम निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपवला आहे. त्यानंतर सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी गुरूवारी (ता. १९) बैठक घेऊन शाळा सुरू करण्यासाठी केलेल्या तयारीचा आढावा घेतला.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव कमी असल्याने तसेच पालक आणि शालेय व्यवस्थापन समित्यांनीही त्यासाठी विरोध न केल्याने सोमवारपासून शाळा सुरू होणार असल्याचे नक्की झाले आहे. नव्वद टक्के शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी झाली आहे. दहा टक्के शाळांतील शिक्षक व कर्मचाऱ्यांची तपासणी झालेली नाही. त्यांच्या तपासण्या २४ व २५ नोव्हेंबर रोजी करण्याचे नियोजन आहे. दरम्यान जिल्ह्यातील ६४७ शाळापैकी ५४२ शाळांनी सोमवारी शाळा सुरू करण्यासाठी संमती दिली आहे. यात नववी व दहावीसाठी १६ टक्के तर अकरावी व बारावीसाठी २९ टक्के पालकांचे संमती पत्र आले आहे. शाळा व वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण करण्याचे काम सुरू असल्याने सोमवारी नव्वद टक्के शाळा सुरू होणार असल्याचा विश्वास प्रशासनाला आहे.

शाळा उघडणार, येण्याची सक्ती नाही
सरकारच्या आदेशानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करून प्रशासनाने सोमवारपासून शाळा सुरू करण्याची तयारी केली आहे. त्यानुसार सोमवारी शाळा उघडल्या जातील. मात्र, विद्यार्थ्यांनी शाळेत येण्याची सक्ती केली जाणार नाही. शाळा सुरू करण्यासाठी ग्रामीण किंवा शहरी भागातून कोणीही विरोध केला नसला तरी पालकांच्या इच्छेनुसार विद्यार्थी शाळेत येतील, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली जामदार यांनी स्पष्ट केले. तर शहरातील सर्व १३० शाळा सोमवारपासून सुरू करण्याची तयारी झाली असून शाळांना आवश्यक सुविधा महापालिकेकडून देण्यात आल्याचे आयुक्त देविदास टेकाळे यांनी सांगितले.
 

Edited - Ganesh Pitekar