esakal | दारु दुकानाच्या विरोधात व्यापाऱ्यांनी ठेवली बाजारपेठ बंद, पालकमंत्री अमित देशमुखांकडे मध्यस्थीची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Chakur Market

चाकुर शहरातील मुख्य बाजारपेठेत होत असलेल्या दारु विक्री दुकानाच्या विरोधात व्यापाऱ्यांनी मंगळवारी (ता.१५) बाजारपेठ बंद ठेवून निषेध नोंदविला.

दारु दुकानाच्या विरोधात व्यापाऱ्यांनी ठेवली बाजारपेठ बंद, पालकमंत्री अमित देशमुखांकडे मध्यस्थीची मागणी

sakal_logo
By
प्रशांत शेटे

चाकुर (जि.लातूर) : शहरातील मुख्य बाजारपेठेत होत असलेल्या दारु विक्री दुकानाच्या विरोधात व्यापाऱ्यांनी मंगळवारी (ता.१५) बाजारपेठ बंद ठेवून निषेध नोंदविला. सदरील दुकान या ठिकाणी होऊ नये याबाबतचे निवेदन पालकमंत्री अमित देशमुख यांना देण्यात आले आहे.


शहरातील मुख्य बाजारपेठेतील एका जागेत मद्य विक्रीचे दुकान सुरु करण्यात येत आहे. या ठिकाण हे दुकाने सुरू करण्यास परवानगी देऊ नये असा ठरावही नगरपंचायतीने घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. तरीही या ठिकाणी दुकानास परवानगी देण्यात आल्याची माहिती आहे. ही जागा बाजारपेठेतील मध्यवर्ती ठिकाणी आहे. या ठिकाणापासून मंदिर, शाळा, मशिद हे जवळ असून चारही बाजूने घरे आहेत. तसेच परिसरात शिकवण्या चालतात.

या ठिकाणी दारूचे दुकान सुरु झाल्यास बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांना तसेच शाळेत जाणाऱ्या मुलामुलींना मोठा त्रास होणार आहे. दारूच्या दुकानामुळे बाजारपेठेत गोंधळ निर्माण होणार असून इतर दुकानामध्ये ग्राहक येणार नाहीत. नागरिकांच्या मागणीनुसार दारू दुकानाला बाजारपेठेत परवानगी देऊ नये, असा ठराव नगरपंचायतीने दिला असतानाही राज्य उत्पादन शुल्क विभागाने याचा विचार न करता परवानगी दिली आहे. हा परवाना तातडीने रद्द करावा.

शेतकऱ्यांनी केला रास्ता रोको, जालना-बीड महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रंगा

अन्यथा बाजारपेठ बंद ठेऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा व्यापाऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला होता. परंतू राज्य उत्पादन शुल्क विभागाने याची दखल घेतली नसल्यामुळे व्यापाऱ्यांनी उत्स्फुर्तीपणे मगंळवारी बाजारपेठ बंद ठेऊन निषेध नोंदविला. याबाबतचे निवेदन तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे यांच्याकडे देण्यात आले. यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष नितीन रेड्डी, सिध्देश्वर पवार, अभिमन्यु धोंडगे, प्रभाकर करंजकर, बालाजी सूर्यवंशी, नारायण बेजगमवार, महादेव शेटे, संजय कस्तुरे, सुमित होनकर, ज्ञानेश्वर बेजगमवार आदी व्यापारी उपस्थित होते. तसेच व्यापाऱ्यांनी अहमदपुर येथे जाऊन पालकमंत्री अमित देशमुख, आमदार बाबासाहेब पाटील यांच्याकडे निवेदन देऊन सदरील दुकान बाजारपेठेत सुरु करू देऊ नये अशी विनंती केली. अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन पालकमंत्री श्री.देशमुख यांनी व्यापाऱ्यांना दिले.

संपादन - गणेश पिटेकर