esakal | Video : पाहा...कठाळ्यांच्या झुंजीने परभणीत काय झाले 
sakal

बोलून बातमी शोधा

Parbhani News

 तब्बल अर्धा तास चाललेल्या या झुंजीत कठाळे कशालाही दाद देत नसल्याने उपस्थितांच्या मनोरंजनासोबतच काळजाचा ठोका चुकविणाऱ्या या प्रसंगामुळे तब्बल अर्धा तास हमरस्त्यावरील वाहतूक बुधवारी (ता. चार) खोळंबली होती.

Video : पाहा...कठाळ्यांच्या झुंजीने परभणीत काय झाले 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परभणी : कारेगाव रस्त्यावर बुधवारी (ता. चार) रात्री आठच्या सुमारास दोन कठाळ्यांच्या (बैल) झुंजीमुळे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला होता. रस्त्याच्या मधोमध सुरू असलेल्या या झुंजीमुळे तब्बल अर्धा तास रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. कठाळ्यांच्या या दादागिरीचा रस्त्यावरून जाणाऱ्या पादचारी व वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

दरम्यान, तब्बल अर्धा तास चाललेल्या या झुंजीत कठाळे कशालाही दाद देत नसल्याने उपस्थितांच्या मनोरंजनासोबतच काळजाचा ठोका चुकविणाऱ्या या प्रसंगामुळे तब्बल अर्धा तास हमरस्त्यावरील वाहतूक बुधवारी (ता. चार) खोळंबली होती.

कारेगाव रस्त्यावरील सिद्धिविनायक पेट्रोलपंपासमोर दोन कठाळ्यांमध्ये अचानक झुंज सुरू झाली. दोन्हीही कठाळे एकमेकांवर तुटून पडू लागल्याने रस्त्यावरील ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना याचा मोठा त्रास होऊ लागला होता. हे कठाळे कधी रस्त्याच्या मधोमध, तर कधी बाजूने जात असल्याने, अचानकच समोर येत असल्याने वाहनधारकांची मोठी तारांबळ उडू लागली होती.

हेही वाचा - रोगाची लागण झाल्याने  घोड्याचा दया मरणाचा प्रस्ताव

ऑटोवर आदळला वळू
काही काळ रस्त्यावर सुरू असलेली ही झुंज पेट्रोलपंप परिसरात सुरू झाल्याने तेथील कर्मचाऱ्यांसह वाहनधारक अचानकच मध्ये आलेल्या या वळूंमुळे धास्तावले. पेट्रोल भरत असतानाच एक वळू वाहनांकडे गेल्याने तेथील एक-दोन मोटारसयाकल पडल्या. मात्र, कर्मचाऱ्यांनी मोठ्या धिटाईने त्यांना पेट्रोलपंपाच्या परिसरातून हुसकावून लावले. पुन्हा रस्त्यावर सुरू झालेल्या झुंजीमुळे भरधाव येणाऱ्या वाहनधारकांचे अचाकन कचा-कच ब्रेक लागू लागले होते. प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या ऑटोरिक्षांनाही याचा मोठा त्रास सहन करावा लागला. एका ऑटोवर वळू जाऊन आदळला. त्यामुळे ऑटोतील एका प्रवाशास त्याचा मार लागला. नवामोंढा पोलिस ठाण्यासमोर उभ्या असलेल्या अन्य एका ऑटोरिक्षासह या कठाळ्यांनी धडक दिली. त्याचबरोबर एक सायकलस्वार सायकल सोडून बाजूला गेल्याने बालंबाल बचावला. मात्र, सायकलवर कठाळ्यांचे पाय पडल्याने सायकलचे मोठे नुकसान झाले.

हेही वाचा - दीड लाख शेतकरी पीकविम्यापासून वंचित

नागरिकांची तोबा गर्दी 
कठाळ्यांची ही झुंज पाहण्यासाठी ये-जा करणाऱ्या वाहनधारकांसह पायी जाणाऱ्या नागरिकांची तोबा गर्दी या वेळी रस्त्यावर जमली होती. ही कठाळ्यांची झुंज सुपर मार्केटजवळ आल्यानंतर तेथे मात्र, दहा बारा मिनिटे ही झुंज सुरू होती. राजगोपालचारी उद्यानाकडून येणाऱ्या रस्त्याकडून तसेच कारेगाव रस्त्यावरून दुतर्फा जाणाऱ्या वाहनधारकांना यामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. अचानक रस्त्यावर आलेल्या या वळूंमुळे वाहनधारक काहीसे भांबावून जात होते. त्यातच झुंज पाहणारे नागरिक ओरडून, हातवारे करून वाहनधारकांना थांबविण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, अनेक जण काहीसे विचलित होत असल्याचे दिसून आले.

वाहनधारकांचा जीव टांगणीला
कठाळ्यांची ही झुंज सुपर मार्केटच्या गेटमध्ये गेल्यानंतर संपुष्टात आली. मात्र, तोपर्यंत वाहनधारकांचा जीव चांगलाच टांगणीला लागला होता. दोन्ही वळूंना वेगळे करण्यासाठी अनेकांनी मोठे प्रयत्न केले. काहींनी त्यांच्या अंगावर पाणी टाकले, तर अनेकांनी हुसकावून लावण्यासाठी वेळप्रसंगी दगडही मारली. मात्र, हे कठाळे कशासच दाद देत नसल्याने सुमारे अर्धा तास उपस्थितांचे  मनोरंजन झाले.

मात्र, या मनोरंजनात अनेक वेळा नागरिकांच्या हृदयाचा ठोकाही चुकला. कारण अचानकच हे कठाळे यांच्या धुंदीतच वाहनाकडे जात होते. त्यामुळे वाहनधारकांस इजा होते की काय, तो पडतो की काय, अशीच भीती तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांच्या मनात होती. एकीकडे मनोरंजनासोबतच काळजाचा ठोका चुकविणाऱ्या या प्रसंगामुळे तब्बल अर्धा तास हमरस्त्यावरील वाहतूक खोळंबल्याचे चित्र बुधवारी (ता. चार) परभणीकरांनी अनुभवले.

loading image
go to top