प्रवाशांसाठी रेल्वेचा ‘हा’ प्रवास बनला कसरतीचा 

ned0349893282
ned0349893282

परभणी ः परभणी ते नांदेड रेल्वे प्रवासाला जाताय... तेही दुपारी... मग जरा थांबा, विचार करा आणि मगच जा... कारण तुम्हाला जोरदार कसरती करून, उड्या मारून रेल्वे पकडायची आहे, बर का..? असे अनुभव सांगितले आहेत रोज अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांनी. परभणी ते मिरखेल कोणत्याही स्थानकावर एकाच वेळी नांदेडकडे जाणाऱ्या दोन पॅसेंजर रेल्वे येतात. यात नगरसोल-नांदेड आणि मनमाड-काचिगुडा यांचा समावेश आहे. मग एका बाजूला प्लॅटफॉम नसणाऱ्या रूळावर आलेली तीच रेल्वे पुढे जाणारी असते. मग काय..? सुरू होतो प्रवाशांचा कसरतीचा खेळ. इकडून तिकडे जागा पकडा, गाडी पकडा... केवळ प्रवासाचा पल्ला गाठण्यासाठी रोज वेगळे स्थानक आणि केवळ गाडीचे नाव, क्रमांक, इतकाच काय तो फरक. ६० किलोमीटर जाण्यासाठी जिवाची कसरत करून प्रवास करावा लागत आहे.

गुरुवारची झालेली गैरसोय
ताशी १४ किलोमीटरचा प्रवास दुहेरीकरण झाल्यावर होत आहे, अशी समस्या कायम निर्माण होत आहे. गुरवारी दुपारी १२.३० वाजता ५७५४१ नगरसोल-नांदेड परभणीत वेळेवर दाखल तरीही १.२० पर्यंत इथेच उभी केली. या काळात एक मालगाडी पूर्णेकडे गेली, तर एक मालगाडी परभणीला आली. १.२० ते १.४० पर्यंत मिरखेल ही रेल्वे आली. मग पुन्हा एक मालगाडी पूर्णेतून मिरखेलकडे आणि मग २.१० ला काचीगुडा पॅसेंजर मिरखेल येथे आली. मग ५७५६१ पुर्णेतून मिरखेलला आणली. अखेर २.३० ला पूर्णाकडे ५७५६२ रवाना झाली. सकाळी एक ते दोन तास उशिराने गेलेल्या पनवेल-नांदेड, पुशपूल या रेल्वेनंतर तब्बल साडेतीन तासाने एक रेल्वे नांदेडला आली.

प्रशासनाने नियमच रुळावर बसविले
एरव्ही दादरा वापरून जीव वाचवा, रेल्वेरूळ ओलांडू नका, सुरक्षित प्रवास करा, असे सांगणाऱ्या प्रशासनाने सगळे नियम रुळावर बसविले आहेत. एकतर वेळेत गाडी सोडायची नाही, लेट करून अजून उशीर करायचा. असे असताना गेल्या आठ दिवसांपासून रोज हेच नाटक प्रवाशांना दाखविले जात आहे. १५ रुपयांत तीन तासांचा प्रवास करण्याची वेळ आली आहे. रोष ओढू नये यासाठी रोज एकाच स्थानकावर हा प्रकार होऊ नये म्हणून वेगळी स्थानके, रेल्वे बदलण्याची वेळ येत आहे. या आठवड्यात मंगळवारी पिंगळी, गुरुवारी मिरखेल, तर सोमवारी परभणी येथे मनमाड-काचिगुडा, नगरसोल- नांदेड या रेल्वेंची अदलाबदली करावी लागली.

प्रवासी एकत्र येत नाहीत
प्रवासी एकत्र येत नाहीत, लोकप्रतिनिधीला ही बाब कशीच कळत नाही व प्रशासन ऐकत नाही, या तिघांच्या त्रासात केवळ अप-डाऊन करणारे भरडले जातात. त्यांना सगळे माहीत असते; पण त्यांना कोणी सहकार्य करत नाही. पर्यायाने रोजचा प्रश्न असूनही तो सुटत नाही. कधीतरी एकदा प्रवासाला जाणारे प्रवासी जाऊ द्या ना, थोडे अंतर राहिले आहे, कशाला वाद, भांडण म्हणून निमूटपणे हा त्रास सहन करतात.

ही आहेत मुख्य कारणे...
नांदेड येथे आदिलाबाद इंटरसिटी प्लॅटफॉर्म नंबर चारला तीनपर्यंत अडीच तास रिकामी उभी केली जाते,. एकवर रोज चार वाजता जाणाऱ्या विशाखापट्टणम, संत्रागच्छी, संबलपूर या गाड्या असतात. केवळ दोन आणि तीन प्लॅटफॉर्म रिकामे असतात. त्यावर काचीगुडा- मनमाड, पुशपूल, नरखेड इंटरसिटी असतात आणि सेन्टरिंगच्या गाड्या, मालगाड्या असतात.
पूर्णेत चारला इंटरसिटी दोन्ही, अमृतसर, उना हिमाचल, मनमाड पॅसेंजर, दोन किंवा तीनला अकोला-पूर्णा, पूर्णा-परळी आणि एकवर गंगानागर, हमसफर, आणि दोन ट्रॅक मालगाडीचे असतानाही एक ते दोन मालगाड्या परळी जाणाऱ्या अकोला किंवा मुदखेड येथून केवळ दुपारी १२ ते तीनच्या मध्ये मिरखेलकडे सोडल्या जातात. कारण त्या वेळी ट्रॅक रिकामे आणि ट्रॅफिक कमी असते. ही कारणे नांदेडला जाणाऱ्या दुपारच्या गाड्यांना आणि पर्यायाने प्रवाशांना घातक ठरत आहेत.

मालगाड्यांमुळे मिळेना प्लॅटफॉम
मुदखेड, अकोलाकडून परळीकडे कोळसा घेऊन जाणाऱ्या मालगाड्या गेल्या काही दिवसांत इतक्या वाढल्या आहेत, की पॅसेंजरला पूर्णा, नांदेड येथे प्लॅटफॉम मिळण्यासाठी तासभर वाट पाहण्याची वेळ आलेली आहे. रेल्वे प्रशासन प्रथम प्राधान्य मालगाडीला देते हे ठीक आहे, त्यातून मिळणारे उत्पन्न जास्त आहे, पण प्रवासी काही चिंचोके देऊन प्रवास करत नाहीत, ते पण कष्टाचे पैसे देऊन टिकीट घेतात, त्यांना दुय्यम स्थान देऊन कोणत्याही स्थानकावर ताटकळत ठेवले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com