बीडमध्ये व्यापाऱ्यांना मारहाण - वादग्रस्त पोलिस निरीक्षक मोरे व तळेकरांची बदली

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 May 2020

  • मोरेंकडून व्यापाऱ्यांना मारहाणीचा आरोप
  • तळेकरांकडून रुग्णांच्या वाहनांची अडवणूक
  • आमदार मेटे व क्षीरसागर यांनीही केली होती तक्रार
     

बीड - लॉकडाऊनमधील संचारबंदी शिथिलतेच्या काळातही कारवायांचा अतिरेक करुन व्यापारी व सामान्यांना मारहाण आणि अपमानित करण्यासह त्रास देण्याचा आरोप असणाऱ्या वासुदेव मोरे व राजीव तळेकर या दोन पोलिस निरीक्षकांची अखेर शनिवारी (ता. १६) रात्री उशिरा औरंगाबादच्या कंट्रोल रूमला अटॅचमेंट करण्यात आली. 
या दोन्ही पोलिस निरीक्षकांबाबत आमदार विनायक मेटे व आमदार संदीप क्षीरसागर यांनीही तक्रारी केल्या होत्या.

मागे जिल्ह्यात विषम तारखेला सकाळी सात ते साडेनऊ या वेळेत संचारबंदीत शिथिलता हेाती. यातही काही ठराविक दुकानेच उघडण्याची मुभा होती. मात्र, जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राहूल रेखावार यांनी बुधवार (ता. १३) पासून संचारबंदी शिथिलतेची वेळ वाढवत सकाळी सात ते दुपारी दोन केली. तसेच या दिवशीपासून कपडे, बुट - चप्पलसह इतर काही दुकाने उघडण्यासही मुभा दिली. त्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठ सुभाष रोडवरील व्यापाऱ्यांनी दुकाने उघडताच पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दुकानात जाऊन व्यापाऱ्यांना मारहाण केली.

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...

व्यापारी दुकाने उघण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश दाखवीत असतानाही आदेश मला माहित नाहीत अशी भाषा पोलीस वापरल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप आहे. कहर म्हणजे व्यापाऱ्यांसह गर्भवती व्यापारी पत्नीलाही पोलिस व्हॅनमध्ये बसवून ठाण्यात नेत अपमानित केल्याचा आरोप होता. तशाच तक्रारी वाहतूक शाखेबाबतही होत्या. वाहनात गर्भवती असतानाही वाहने अडविणे, अत्यावश्यक सेवेचा पास असलेल्या वाहनांवर कारवाईसह विनाकारण त्रास दिल्याचा आरोप होता. या तक्रारींवरुन व्यापाऱ्यांचे व पोलिसांचे जबाबही नोंदविण्यात आले होते. दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा या दोन पोलिस अधिकाऱ्यांची औरंगाबादच्या पोलिस कंट्रोल रुमला अटॅचमेंट करण्यात आली.

हेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी... 

आमदार मेटे, क्षीरसागरांच्याही तक्रारी
या प्रकरणी व्यापाऱ्यांनी शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांची भेट घेऊन कैफियत मांडली. त्यावर श्री. मेटे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोनवर ही घटना सांगून निवेदनही पाठविले. तसेच वासुदेव मोरे यांच्या निलंबनाची मागणी केली होती. जिल्हा प्रशासन उत्तम काम करत असताना हा प्रकार गालबोट लावणारा असल्याचे मेटे म्हणाले हेाते. तर, व्यापाऱ्यांनी या मारहाणीच्या विरोधात पुकारलेल्या बंदला आमदार संदीप क्षीरसागर यांनी पाठींबा देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तक्रार दिली होती. वासुदेव मोरे व राजीव तळेकर यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. व्यापाऱ्यांची त्यांनीही बैठक घेतली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Transfer of Police Inspector More and Talekar