साहित्याच्या कंटेनरमध्ये चक्क तंबाखूची वाहतूक... 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 June 2020

परभणीत स्थानिक गुन्हे शाखेने शहरातून जाणाऱ्या एका कंटेनरला अडवून त्याची तपासणी केली असता त्यात सुगंधित तंबाखुचा साठा शुक्रवारी (ता.पाच) आढळला. हा माल साडेपाच लाखाचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. दुसऱ्या घटनेत महातपुरी येथे वाळू चोरीबाबत पाहणी करण्यास गेलेल्या दोन तलाठ्यांना वाळू तस्करांनी मारहाण केल्याची घटना गुरुवारी (ता.चार) रात्री घडली. तर तिसऱ्या घटनेत सारंगी (ता. पूर्णा) येथील नदीपात्रात अंधाराचा फायदा घेत शासनाचा महसूल बुडवत विनापरवाना वाळू उपसा करणाऱ्या चार ट्रॅक्टरचालकांवर गुन्हा दाखल करत चारही ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त करत १६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

परभणी ः शहरातून जाणाऱ्या एका ट्रकला थांबवून त्याची तपासणी केली असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला तब्बल पाच लाख ७२ हजार ४०० रुपयांची सुगंधी तंबाखु जप्त केली. ही कारवाई शुक्रवारी (ता.पाच) दुपारी करण्यात आली. 

शहरातील नानलपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी केलेल्या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कंटेनर (क्रमांक आरजे ५२ जीए ३७४२) हे संशयितरित्या मिळून आला. या बाबत चौकशी केली असता त्याने कंटेनरमध्ये ईलेक्ट्रीक पार्ट, भांडे, स्टेशनरी, ताडपत्री व सुगंधित तंबाखु असल्याचे सांगितले. याबाबत पथकाने तपासणी केली असता त्यात कोणतेही नाव नसलेले तंबाखुचे पाकीट आढळून आले. या तंबाखुची मोजदाद केली असता, ती पाच लाख ७२ हजार ४०० रुपयांची भरली. तसेच त्यांनी कंटेनर जप्त केले. या प्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाई पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेश मुळे, सुग्रीव केंद्रे, मधुकर चट्टे, हनुमंत जक्केवाड, शंकर गायकवाड, अरूण पांचाळ यांनी केली. 

हेही वाचा - आंदोलकांनी पसरवलं, पोलिसांनी आवरलं...!

महातपुरी येथे वाळूतस्करांची तलाठ्यास मारहाण
सोनपेठ ः वाळू चोरीबाबत पाहणी करण्यास गेलेल्या दोन तलाठ्यांना वाळू तस्करांनी मारहाण केल्याची घटना गुरुवारी (ता.चार) रात्री घडली. महातपुरी (ता.गंगाखेड) गोदापात्रात वाळू चोरी होत असल्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी गंगाखेडचे तहसीलदार स्वरूपसिंह कंकाळ यांनी दोन तलाठ्यांना सोबत घेऊन मोटारसायकलवर (ता.चार) रात्री साडेअकराच्या सुमारास महातपुरी येथे धाड टाकली. या वेळी त्यांना महातपुरी येथील गायरानात एक ट्रॅक्टर अवैध वाळू चोरी करून जात असल्याचे दिसताच तलाठी नेमाडे यांनी संबंधित ट्रॅक्टर थांबवून वाळूबाबत चौकशी केली. ट्रॅक्टरचालकाने फोन करून आपल्या साथीदारांना बोलावून घेतले. दोन मोटारसायकलवरून आलेल्या पाच जणांनी तलाठी नेमाडे यांना चापट बुक्क्यांनी मारायला सुरुवात केली. या वेळी त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या तलाठी रुपेश मुलंगे यांनादेखील वाळू तस्करांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीनंतर वाळू चोर ट्रॅक्टर घेऊन पसार होण्याचा प्रयत्न करताना तहसीलदार कंकाळ हे दुसऱ्या मोटारसायकलवर पोचले. मात्र संबंधित वाळू चोरटे ट्रॅक्टर सोडून पसार झाले. तलाठी अक्षय नेमाडे यांच्या फिर्यादीवरून रामकीसन दंडवते व नागोराव दंडवते यांच्याविरुद्ध सोनपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तपास सहायक पोलिस निरीक्षक श्रीनिवास भिकाने करत आहेत. 

हेही वाचा - आरोग्य पथक पोचले सात हजार घरांपर्यंत...

सोळा लाखांचा मुद्देमाल जप्त
पूर्णा : सारंगी (ता. पूर्णा) येथील नदीपात्रात अंधाराचा फायदा घेत शासनाचा महसूल बुडवत विनापरवाना वाळू उपसा करणाऱ्या चार ट्रॅक्टरचालकांवर गुन्हा दाखल करत चारही ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त करत १६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सारंगी नदीपात्रात अंधाराचा फायदा घेत विनापरवाना वाळू उपसा करत होते. मात्र, पोलिसांच्या पथकाचा सुगावा लागताच चारही ट्रॅक्टरचालक वाळूने भरलेल्या ट्रॉल्या रिकाम्या करून पळून गेले. चारही चालकांवर विविध कलमान्वये चुडावा पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. पाच) गुन्हा दाखल करण्यात आला. चारही ट्रॅक्टर व ट्रॉल्या (अंदाजे किंमत १६ लाख) जप्त करण्यात आल्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Transporting chucky tobacco in a container of material, parbhani news