उस्मानाबादमध्ये दुचाकीवर दोघांना तर मोटारीत चौघांना परवानगी

सयाजी शेळके
रविवार, 2 ऑगस्ट 2020

जिल्ह्यातील कोरोणा बाधितांचा आकडा दीड हजाराच्या पुढे सरकला आहे. दररोज दीडशे ते दोनशे बाधित रुग्णांची भर दररोज पडत आहे.

उस्मानाबाद : जिल्ह्यातील दुचाकीवरील बंदी उठवण्यात आली आहे. दुचाकीवर दोघे तर मोटारीत चौघांना बसून जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी रविवारी (ता. दोन) आदेश काढले असून लॉकडाऊन ३१ ऑगस्ट पर्यंत वाढविण्यात आले आहे. 

जिल्ह्यातील कोरोणा बाधितांचा आकडा दीड हजाराच्या पुढे सरकला आहे. दररोज दीडशे ते दोनशे बाधित रुग्णांची भर दररोज पडत आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी प्रशासनाला सूचना मिळत आहेत. रुग्ण संख्या वाढत असल्याने त्वरित लॉकडाऊन करा, अशाही सूचना काही भागातून येत होत्या. तर दुसऱ्या बाजूने  लॉकडाऊन करू नये. असे विचार मांडणारा दुसरा वर्ग होता. मात्र वरिष्ठ पातळीवरून  लॉकडाऊन चा पर्याय नसल्याने सांगितले जात असल्याने आता जिल्हास्तरावरूनही  लॉकडाऊन जरी असले तरी अनेक बाबींना मर्यादा ठेवून परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी तीन दिवसांपूर्वी दुचाकीला बंदी घातली होती. काही टवाळखोर लोक जाणीवपूर्वक दुचाकीवर फेऱ्या मारत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे अशा लोकांना आवर घालण्यासाठी दुचाकी बंदी घालण्यात आली होती. मात्र याचा परिणाम अन्य बाबीवर होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाला मिळाल्या.

तसेच पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या रविवारी झालेल्या बैठकीत अनेक लोकप्रतिनिधींनी दुचाकीवरील बंदी हटवण्याची मागणी केली होती. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार सुजितसिंग ठाकूर, आमदार कैलास घाडगे पाटील यांनी दुचाकीवर बंदी हटवण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी नवीन आदेश काढले आहेत.

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक    

यामध्ये संचारबंदी ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली असली तरी अनेक बाबींना परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये दुचाकीवरील बंदी उठवण्यात असून दुचाकीवर दोघांना फिरण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर चारचाकी मोटारीत चौघांना बसून जाण्याची परवानगी असणार आहे. याशिवाय लग्न समारंभ अन्य कार्यक्रम यांनाही मर्यादा घालून देण्यात आल्या आहेत. तोंडाला मास्क लावणे, सातत्याने निर्जंतुकीकरण करणे अशा बाबी ही सातत्याने कराव्या लागणार आहेत. लॉकडाऊन जरी वाढले असले तरी अनेक बाबी सुरू झाल्याने आता स्वतःला शिस्त लावूनच काम करण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Travel restrictions removed at Osmanabad