एकच झाड लावा अन्‌ त्याला बाळांसारखं जपा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जून 2019

बाळाच्या जन्माची आठवण म्हणून प्रत्येकाने एक झाड लावावे. त्याला बाळांसारखे जपावे. बाळासोबतच त्या झाडाचाही वाढदिवस साजरा करावा, असे भावनिक आवाहन दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने लातूरकरांना केले आहे. त्यामुळे या आवाहनाला आता किती लातूरकर साद देतात, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

लातूर - बाळाच्या जन्माची आठवण म्हणून प्रत्येकाने एक झाड लावावे. त्याला बाळांसारखे जपावे. बाळासोबतच त्या झाडाचाही वाढदिवस साजरा करावा, असे भावनिक आवाहन दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने लातूरकरांना केले आहे. त्यामुळे या आवाहनाला आता किती लातूरकर साद देतात, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

वाढते प्रदूषण व सातत्याने होणारा पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी तमिळनाडूमधील भारत वृक्ष क्रांती मोहिमेचे संस्थापक ए. एस. नाथन यांनी अकोला जिल्ह्यात ‘एक जन्म, एक वृक्ष’ या मोहीम राबवली आहे. या माध्यमातून जिल्ह्यात ५० हजारांवर झाडे लावून ती जगवण्यात आली आहेत. त्या धर्तीवर लातूर महापालिकेच्या वतीनेही ‘एक जन्म, एक वृक्ष’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे. ती यशस्वीपणे राबवण्यासाठी आशा स्वयंसेविका, आरोग्यसेविका यांची मदत घेतली जाणार आहे, असे महापालिकेने जाहीर केले आहे.

ज्या कुटुंबात गरोदरमाता आहेत, अशा कुटुंबास वारंवार भेटी देऊन प्रसूतीनंतर जन्माला येणाऱ्या नवजात बालकाची आठवण म्हणून किमान एका वृक्षाची लागवड करण्याकरिता त्या कुटुंबास आरोग्य सेविका प्रोत्साहित करतील.

जन्माला येणारे बाळ जसे मोठे होईल तसे वृक्षही मोठे होणार असल्याने बाळासोबत वृक्षाचाही वाढदिवस संबंधित कुटुंबाने साजरा करावा, बाळाप्रमाणेच वृक्षाचीही काळजी घ्यावी, झाडाभोवती काटेरी कवच तयार करावे, वेळेवर पाणी-खत घालत त्याकडे विशेष लक्ष द्यावे, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tree Plantation Drought Municipal