हापूस आंब्यानी सजले तुळजाभवानी मातेचे मंदिर

जगदीश कुलकर्णी
मंगळवार, 21 मे 2019

तुळजाभवानी मातेच्या सीमोल्लघंनासाठी बुऱ्हानगर येथील पालखी दसऱ्याच्या दिवशी पहाटे तुळजाभवानी मंदिरात येते. बुऱ्हाणपूर येथील भगत कुटुंबियांची तुळजाभवानी ही लेक समजण्यात येते.

तुळजापूर - तुळजाभवानी मातेस लेक समजल्या जाणाऱ्या पित्ररूपी भगत कुटूंबियांकडून अकरा सहस्रपेक्षा जास्त हापूस आंब्यानी तुळजाभवानी मातेचे मंदिर मंगळवारी (ता. 21) फुलासह सजविण्यात आले. जितेंद्र जगदीश भगत यांनी हा उपक्रम पहिल्यांदाच राबविला.    

तुळजाभवानी मातेच्या सीमोल्लघंनासाठी बुऱ्हानगर येथील पालखी दसऱ्याच्या दिवशी पहाटे तुळजाभवानी मंदिरात येते. बुऱ्हाणपूर येथील भगत कुटुंबियांची तुळजाभवानी ही लेक समजण्यात येते. भगत कुटुंबियांची आणि तुळजाभवानीची भेट दसऱ्याच्या दिवशी होण्याची प्राचीन परंपरा आहे. जितेंद्र भगत यांनी तुळजाभवानी मातेस आंब्याची आरास करून प्राचीन परंपरेला नव्या उपक्रमाने वेगळा शिरपेच गोंदला आहे. तुळजाभवानी मंदिरात मंगळवारी पहाटे एकपासूनच हापूस आंब्याचा सुगंध सर्वत्र दरवळत होता. तुळजाभवानी मातेच्या महाद्वारावर कोणत्याही सण, उत्सवाच्या वेळी आंब्याच्या फाट्याचे तोरण बांधले जाते. तेथे देठासह हापूस आंब्याचे तोरण लावले होते. तुळजाभवानी मातेच्या सिंहाच्या गाभाऱ्यासमोर हे तोरण बांधले होते. याशिवाय तुळजाभवानी मातेच्या मुख्य मंदिरासभोवती आंबे लावून परिसर सुशोभित केला होता. तुळजाभवानी मातेच्या मुख्य गाभाऱ्यात सकाळी अकरानंतर हापूस आंब्याने सजवण्यात आले. मुख्य गाभारा सजविण्यासाठी सुमारे दीड तास लागला. मुख्य गाभारा, येमाई, नरसिंह, दत्त पादुका आदींसह सर्व भाग सजविण्यात आला होता. चोपदार दरवाज्यावर फुलांचे तोरण, आंबे लावण्यात आले होते. 30 कामगार येथे यासाठी जितेंद्र भगत यांनी पुणे येथून आणले होते. सोमवारी (ता. 20) मध्यरात्रीपासून मंदिर सजविण्याचे काम सुरू होते. श्री भगत यांनी तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून या उपक्रमासाठी रितसर मान्यता घेऊन हा उपक्रम राबविला. तुळजाभवानी मंदिर समितीच्या अध्यक्ष, जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी जितेंद्र भगत यांना लेखी परवानगी दिली होती. तुळजाभवानी मातेस उत्कृष्ट हार, फुले आणि आंब्यांनी सजविले होते. 

तुळजाभवानी मातेचे मंदिर हापूस आंब्याने सजविण्यासाठी सेवाभावीवृत्तीने हा उपक्रम राबविला आहे. अवघ्या एका सप्ताहात सर्व केले. प्रशासनाने सहकार्य केले तसेच स्थानिकांचेही सहकार्य लाभले. 
- जितेंद्र जगदीश भगत, तुळजाभवानी मातेच्या बुऱ्हानगरच्या पालखीचे मानकरी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tuljabhavani temple decorate by hapus mango in tuljapur