परभणी शहरातून बारा लाख रुपयाचे चोरीचे तांबे जप्त !

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 डिसेंबर 2019

दोन आरोपींना अटक; दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई

परभणी : परभणी शहरातून चोरीचे तांबे ते घेऊन जाणाऱ्या एका ट्रकला दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलिसांनी शनिवारी (ता.सात) रात्री आडवून चौकशी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात तांबे असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. अधिक चौकशी केली असता हे चोरीची तांबे असून विक्रीसाठी नेले जात असल्याचे पोलिसांच्या समोर आले. पोलिसांनी सदर ट्रक जप्त केला असून दोघांना अटक केली आहे.

परभणी शहरातील खंडोबा बाजार परिसरात एका ट्रकमध्ये भंगार सामान भरत असल्याचे दहशतवाद विरोधी पथकाच्या लक्षात आले. या वेळी हे पथक गस्तीसाठी बाहेर जात होते. दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख फौजदार विश्वास खोले यांनी सदर ट्रकला अडवून विचारपूस केली. तेव्हा या ट्रकमध्ये तांब्याच्या पट्ट्या असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी अधिक चौकशी केली असता या तांब्याचे पट्ट्या चोरीच्या असल्याचे त्यांना समजले. त्यांनी तातडीने सदर ट्रक जप्त करून नानलपेठ पोलिस ठाण्यात आणला. त्यानंतर रात्री उशिरा दोघांना ताब्यात घेण्यात आले.

तीन टन तांब्याच्या पट्ट्या
याप्रकरणी पोलिसांनी भंगार दुकान चालक शेख अजमत अली शेख मदर आली (वय ३८, रा.जिजामाता रोड, परभणी) व ट्रक चालक गणेश नारायण मिरासे (वय ४५) (रा.शिरड शहापूर ता. औंढा जि. हिंगोली) या दोघांना ताब्यात घेतले आहे. ट्रक मध्ये अंदाजे तीन टन तांब्याच्या पट्ट्या होत्या. त्याची बाजारात किंमत १२ लाखाच्या आसपास होत असल्याची माहिती फौजदार विश्वास खोले यांनी दिली. या कारवाईत दहशतवाद विरोधी पथकाचे भारत नलावडे, दत्तात्रय चिंचाने, अजहर पटेल, दीपक मुदीराज व सुधीर काळे यांचा समावेश होता. याप्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यात पोलिस हवालदार भारत नलावडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास नानलपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार राजेश्वर पाटील हे करीत आहेत.

हे ही वाचा....

दोन चंदन चोर पोलिसांच्या ताब्यात

परभणी : अज्ञात शेतकऱ्यांच्या शेतामधून साडे अकरा हजार रुपयाचे चंदन चोरून घेऊन जात असलेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने शुक्रवारी (ता.सहा) किन्होळा (ता.परभणी) येथून ताब्यात घेतले. कयूम खान शब्बीर खान पठाण, जाकीर खान माजिद खान पठाण (रा.काठोडी बाजार ता. भोकरदन जिल्हा जालना) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सदर आरोपीकडून ११ हजार ४०० रुपये किंमतीचे पाच किलो ७०० ग्राम चंदन, एक मोटरसायकल आणि मोबाइल, असा मिळून ७० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  दरम्यान, दोन्ही आरोपींना शनिवार (ता.सात) न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twelve lakh rupees worth stolen copper seized from Parbhani city!