‘एमपीएससी’च्या स्पर्धकांची संख्या पाच लाखांहून पंचवीस लाख,पासष्ट हजार पदांसाठी परीक्षा

2MPSC_1
2MPSC_1

लातूर : बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, ही बेरोजगारी दूर करून सरकारी नोकरीच्या माध्यमातून स्वावलंबनाचे धडे गिरवणाऱ्यांची संख्याही वाढतच आहे. यातूनच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने मागील दहा वर्षांत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेला सामोरे जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांची संख्या पाच लाख होती.

ती आता पंचवीस लाखांपर्यंत पोचली आहे. यातूनच एमपीएससीने दहा वर्षांत विविध विभागांच्या ६५ हजार ५६३ पदांसाठी परीक्षा घेतली असून, या पदांसाठी सुमारे एक कोटी १६ लाख पाच हजार १३७ उमेदवारांनी अर्ज केल्याचे दिसत आहे.
स्पर्धकांची संख्या पाहता दहा वर्षांत सरकारी नोकरीसाठी सुरू असलेली जीवघेणी स्पर्धा पुढे आली आहे. राज्य सरकारच्या विविध विभागांतील वर्ग-एक व वर्ग-दोनसह काही विभागांच्या वर्ग-तीन पदांसाठी भरती परीक्षा आयोगाकडून घेण्यात येतात. यात स्पर्धा परीक्षा व सरळ सेवाभरतीसाठी दहा वर्षांत घेतलेल्या परीक्षांची आकडेवारी समोर आली आहे.

परीक्षांचा दर्जा पाहता उमेदवारांचा कस लागतो. पदांची संख्या कमी आणि उमेदवारांची संख्या मोठी असल्याने चुरस आहे. आयोगाकडील आकडेवारी पाहता दहा वर्षांपूर्वी कमी संख्येने उमेदवार परीक्षा द्यायचे. एमपीएससीची स्पर्धा परीक्षा खूप कठीण असते, अशीच मानसिकता विद्यार्थ्यांत तेव्हाही होती आणि आताही आहे. पूर्वी एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षांवर कृषी पदवीधारक विद्यार्थ्यांचा पगडा होता. त्यानंतरच्या काळात सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांनी यात उडी घेऊन आपली गुणवत्ता सिद्ध केली.

सध्याची परिस्थिती पाहिली तर अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचाही स्पर्धा परीक्षेकडे कल वाढला आहे. यामुळे दरवर्षी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली आहे. पूर्वी उमेदवारांना मार्गदर्शनासाठी सुविधा नव्हत्या. दहा वर्षांत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व मार्गदर्शन केंद्रांची संख्याही वाढली आहे. यामुळेच एकेकाळी स्पर्धा परीक्षेचे माहेरघर ठरलेल्या कृषी विद्यापीठ व कृषी महाविद्यालयांची जागा आता मार्गदर्शन केंद्रांनी घेतल्याचे दिसत आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करून तातडीने नोकरी मिळवण्याचा प्रयत्न सर्वच घटकांतील उमेदवार करत आहेत. यामुळेच उमेदवारांची संख्या पाच लाखांवरून २५ लाखांपर्यंत पोचली आहे.

स्पर्धा परीक्षेला जास्त अर्ज
दहा वर्षांत आयोगाने ५५ हजार १४३ पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेतली. तब्बल एक कोटी ११ लाख १९ हजार ९६४ उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केला होता. सरळ सेवाभरतीत दहा हजार ४२० पदांसाठी घेतलेल्या परीक्षेसाठी चार लाख ८५ हजार १७३ उमेदवारांनी अर्ज केले होते. सर्व उमेदवारांकडून आयोगाने परीक्षा शुल्क वसूल केले असून, यात खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागासवर्गीय उमेदवारांना कमी शुल्क आहे. तरीही शुल्काच्या माध्यमातून आयोगाच्या तिजोरीत कोट्यवधीची रक्कम जमा झाल्याचे दिसत आहे.

वर्षनिहाय परीक्षा व उमेदवारांची संख्या

वर्ष  स्पर्धा परीक्षेची पदे अर्ज केलेले उमेदवार थेट भरतीची पदे अर्ज केलेले उमेदवार  
२०१० - २०११ ४२४३  ५५६८३९ १६७८ ५३७७३  
२०११ - २०१२ ६७२७ ५६७५०१ १३०८ ६५०१४  
२०१२ - २०१३ ६१४२ ८३४५७२ १७३३ ७४२९९  
२०१३ - २०१४ ५२९४ ११०५३०५ ७५२ २९२५०  
२०१४ - २०१५ ५०७३ ४५२४०७ १२२३ १५०१३  
२०१५ - २०१६ ५४९२ ५२९६९३ १२१५ ४२४३७  
२०१६ - २०१७ ३२५४ ११३४२०० १०७९ १४३१६५  
२०१७ - २०१८ ८६८८ १७४१०६९ ५१९ २५४०१  
२०१८ - २०१९ ५३६३ २६६४०४१ ४२९ २७८४७  
२०१९ - २०२० ४८६७  १५३४३३७ ४८४

८९७४

 

 

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com