पगारासाठी पैसे मागितले आणि जाळ्यात अडकले...

पांडुरंग उगले 
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. २८) टाकलेल्या छाप्यात केंद्रीय मुख्याध्यापकासह गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचा लिपिक पैसे घेताना जाळ्यात अडकला.

माजलगाव, (जि. बीड) : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. २८) टाकलेल्या छाप्यात केंद्रीय मुख्याध्यापकासह गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचा लिपिक पैसे घेताना जाळ्यात अडकला. एका शिक्षकाची अर्जित रजा तसेच महिन्याचा पगार काढण्यासाठी दोघांनी पैसे घेतल्याने त्यांना ताब्यात घेतले आहे. मुख्याध्यापक शामसुंदर दासरे व लिपिक काशिनाथ बोगुलवार असे ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. 

जिल्हा परिषद शिक्षकांचा महिन्याचा पगार केंद्रीय मुख्याध्यापकामार्फत होतो. यामुळे पगार काढण्यासाठी एका शिक्षकाकडे त्यांनी मागील वर्षभरापासून पैशाची मागणी केली होती. सदर शिक्षकाने पैसे न दिल्याने विविध मार्गाने त्रास देणे सुरू केले होते तसेच सदर शिक्षकाची सहा महिन्यापूर्वीच्या अर्जित रजेचा पगार काढण्यासाठी लिपिक काशिनाथ बोगुलवार याने पैशाची मागणी केली होती. यामुळे फिर्यादी शिक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

हेही वाचा - शेतकरी म्हणतो, साहेब मी जिवंत....अधिकारी म्हणतात मेला

दोघांनीही पैसे मागितल्याचे सिद्ध झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी शुक्रवारी शहरात सापळा रचला. शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय शाळा क्रमांक दोन याठिकाणी संबंधित शिक्षकाकडून पैसे घेताना मुख्याध्यापक श्री. दासरे तर, गटशिक्षणाधिकारी कार्यालयात पैसे घेताना लिपिक श्री. बोगुलवार याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन शहर पोलिस ठाण्यात आणले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक राजकुमार पाडवी यांच्यासह सहकारी कर्मचाऱ्यांनी केली. 

हेही वाचा - बापरे...फक्त खूनच नाही, तर जाळूनही टाकले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two arrested for taking bribe