विहिरीत पडून दोघा सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू, लातूर जिल्ह्यातील घटना

जलील पठाण
Wednesday, 9 December 2020

विहिरीत असलेली मोटार काढून नदीत सोडण्यासाठी विहिरीत उतरलेल्या दोन सख्ख्या भावांचा तोल जाऊन पाण्यात पडल्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना औसा तालुक्यातील आलमला गावात बुधवारी (ता.नऊ) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली.

औसा (जि.लातूर) : विहिरीत असलेली मोटार काढून नदीत सोडण्यासाठी विहिरीत उतरलेल्या दोन सख्ख्या भावांचा तोल जाऊन पाण्यात पडल्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना औसा तालुक्यातील आलमला गावात बुधवारी (ता.नऊ) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. दोन्ही भावांना पोहता येत नसल्याने ही घटना घडली आहे. राहुल बिराजदार (वय २९) आणि शरण बिराजदार (वय २७) अशी मृत भावंडांची नावे आहेत. बुधवारी आलमला येथील राहुल बिराजदार आणि शरण बिराजदार ही दोन्ही भावंडे आपल्या विहिरीतील पाणी कमी झाल्याने विहिरीतील मोटार काढून नदीत सोडण्यासाठी विहिरीत उतरत होते.

दरम्यान राहुल याचा तोल जाऊन तो पाण्यात पडला. राहुल पाण्यात बुडत असल्याने त्याचा लहान भाऊ शरण यानेही भावाला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. दोघेही पाण्यात पडले. मात्र दोघांनाही पोहता येत नव्हते. त्यामुळे ते पाण्यात बुडू लागले. जवळच त्यांचा सालगडी होता. त्यानेही पाण्यात उडी घेत या दोघांना पाण्याच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघेही त्याच्या गळ्याला मिठी मारून त्यालाही बुडवत असल्याने सालगडी कसाबसा आपला जीव वाचावीत पाण्याबाहेर आला.

विहिरीच्या वर येऊन त्याने आरडाओरडा केला. लोक विहिरीपर्यंत पाहोचेपर्यंत दोन्ही भाऊ पाण्यात पूर्ण बुडाले होते. लोकांनी त्यांना बाहेर काढून तातडीने लातूर येथील दवाखान्यात नेले. मात्र तेथे डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या भावांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली असून राहुल हा विवहित आहे तर शरणचे अविवाहित होता. दरम्यान या घटनेचा पंचनामा औसा पोलीस प्रशासन व या दोघांच्याही नावावर शेती असल्याने महसूल प्रशासनाने पंचनामा केला आहे.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Brothers Died In Well Ausa Latur News