दोन मुलांचा विहिरीत पडून मृत्यू, दुसऱ्या दिवशी सापडला मृतदेह

अविनाश काळे
Sunday, 8 November 2020

उमरगा तालुक्यातील चिंचोली जहागीर येथील दोन मुले शनिवारी (ता.सात) दुपारी हरवल्याने शोध सुरू असताना रविवारी ( ता. आठ) दुपारी मुलांचा मृतदेह विहिरीत आढळून आला.

उमरगा (जि.उस्मानाबाद) : तालुक्यातील चिंचोली जहागीर येथील दोन मुले शनिवारी (ता.सात) दुपारी हरवल्याने शोध सुरू असताना रविवारी ( ता. आठ) दुपारी मुलांचा मृतदेह विहिरीत आढळून आला. या घटनेची पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या बाबतची पमाहिती अशी की, तालुक्यातील चिंचोली जहागीर येथील दोन मुले शनिवारी दुपारी हरवल्याने कृष्णा गोपाळ मंठाळे (वय ११, रा. चिंतकोटा (बी.), कर्नाटक, हल्ली मुक्काम चिंचोली ज.), मनीष गोरख माने (वय नऊ, रा.चिंचोली जहागीर) या दोघांचा रात्रीपर्यंत शोध सुरु होता.

कितीही सांगा! प्रलंबित कोरोना चाचण्यांचा प्रश्‍न कायम, आरोग्यमंत्री टोपेंच्या जालना जिल्ह्यातील चित्र

रविवारी दुपारी गावाजवळ असलेल्या औदुंबर ब्याळे यांच्या शेतातील विहिरीत कृष्णाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसल्याने घटनेची माहिती पोलिस ठाण्यात दिल्यावर पोलीस उपनिरीक्षक अमोल मालुसरे, पोलिस कॉन्स्टेबल सलिम शेख यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी पोचले. पाहिला मृतदेह बाहेर काढला. दुसऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीत बोरीच्या फाट्याने शोध घेतला असता दुसरा मृतदेह काढण्यात आला.

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून दोन्ही मृतदेह तपासणीस उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून शवविच्छेदन करून नातेवाईकांकडे देण्यात आले. शेषेराव करण ब्याळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुले खेळत-खेळत जवळ असलेल्या शेतातील एका झाडावरील खोपे काढत असताना पाय घसरून विहिरीत पडून मृत्यू झाल्याचे सांगितले. यावरून पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. पोलिस उपनिरीक्षक श्री.मालुसरे हे तपास करित आहेत.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Children Drowned, Second Day Deat Bodies Found Umarga