esakal | लातूरचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद, नियमित वेळापत्रक कोलमडणार
sakal

बोलून बातमी शोधा

latur

लातूरचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद, नियमित वेळापत्रक कोलमडणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लातूर: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणाजवळ पाइपलाइनमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा उपसा बंद करण्यात आला आहे. या दुरुस्तीचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. तरीही शहराला दोन दिवस पाणीपुरवठा होणार नाही. सध्या आठवड्यातून एकदा महापालिकेच्या वतीने नळाला पाणी पुरवठा केला जात आहे. यात दोन दिवस पाणी येणार नसल्याने या आठवड्यातील नियमित वेळापत्रक कोलमडणार आहे. या वेळेस दोन दिवस उशिराने म्हणजे दहा दिवसांनंतर नळाला पाणी येणार आहे. धनेगाव (ता. केज) येथील मांजरा धरणातून लातूर शहराला पाणीपुरवठा केला जातो. धनेगाव येथील हेड वर्क येथे स्कोरव्हॉल्व्हजवळ पाइपलाइनमधून पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. यातून पाणी वाया जात असल्याने धरणातील पाण्याचा उपसा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा बंद झाला आहे.

सोमवारी (ता. १२) सकाळी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने ही गळती बंद करण्यासाठी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच इतर अभियंता यांच्या उपस्थितीत सकाळपासूनच धनेगाव येथे दुरुस्तीचे कामाला सुरवात करण्यात आली आहे. हे दुरुस्तीचे काम झाल्यानंतर धरणातून पाण्याचा उपसा केला जाणार आहे. त्यानंतर शहराला पाणीपुरवठा होऊ शकणार आहे. गेली काही वर्ष शहराला आठवड्यातून एकदा महापालिकेच्या पाणी पुरवठा केला जात आहे. त्यात दोन दिवस पाणीपुरवठा बंद झाल्याने नियमित वेळापत्रक कोलमडले आहे. दोन दिवस उशिराने म्हणजे दहा दिवसानंतर नळाला पाणी येणार आहे.

हेही वाचा: 'मी दोषी असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील'

मिनी वॉटर स्किमचा आधार
शहरातील अनेक भागात महापालिकेच्या मिनी वॉटर स्किम (विंधन विहिरी) आहेत. याची संख्या एक हजार २८ इतकी आहे. याचे वीज बिल न भरल्याने या स्कीम बंद होत्या. पण, काही दिवसांपूर्वी महापालिकेने याचे वीज बिल भरले आहे. त्यामुळे या स्किम सुरू झाल्या आहेत. यातील बहुतांश विंधन विहिरी या स्लम एरियात आहेत. त्यामुळे त्या भागातील नागरीकांना पाण्यासाठी या स्किमचा मोठा आधार राहत आहे.

धनेगाव येथे धरणाच्या परिसरात पाइपलाइनमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी.
- नागनाथ कलवले, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका.

loading image