esakal | मित्रांची एकाच वेळी एक्झिट, पुलावरुन दुचाकी कोसळून दोघे ठार
sakal

बोलून बातमी शोधा

सचिन पवार व तेजस पाईकराव

मित्रांची एकाच वेळी एक्झिट, पुलावरुन दुचाकी कोसळून दोघे ठार

sakal_logo
By
विठ्ठल देशमुख

सेनगाव (जि.हिंगोली) : सेनगाव-येलदरी मार्गावर पुलाचे बांधकाम मागच्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. पुलावरुन दुचाकी कोसळून दोन तरुण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी (ता.१२) सकाळी घडली आहे. सचिन पवार (वय २५), तेजस पाईकराव (वय २२, दोघे रा. खानापूरचित्ता, ता. हिंगोली) अशी मृत तरुणांची नावे आहेत. हिंगोली (Hingoli) तालुक्यातील खानापूर चित्ता येथील सचिन पवार व तेजस पाईकराव हे दुचाकी वाहनावर सेनगावकडे गेले होते. आज सकाळच्या सुमारास येलदरी (Yeldari) मार्गावर बांधकाम सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामाच्या पाटीला धडक देऊन दोघेही दुचाकीसह पुलाखाली पडले. या अपघातात दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची (Accident In Hingoli) माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांच्याही खिशामध्ये ओळख पटविण्यासाठी कुठल्याही प्रकारचे साधन नसल्यामुळे त्यांच्या भ्रमणध्वनीवरून एका क्रमांकावर संपर्क साधण्यात आला.

हेही वाचा: परभणी : 4 जणांना वाहनानं चिरडलं, मृतांमध्ये पोलीस पाटलाचाही समावेश

त्यावरून हे दोघे जण खानापूर चित्ता येथील असल्याचे स्पष्ट झाले. खानापूर येथील अर्जुन पवार, दत्तराव पवार यांच्यासह गावकरी घटनास्थळी रवाना झाले आहेत. दरम्यान शनिवारी वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी ते दोघेही घरून निघाले होते, अशी प्राथमिक माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे. घटनास्थळी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रणजीत भोईटे, जमादार अनिल भारती, शिवदर्शन खांडेकर यांचे पथक दाखल झाले आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. दरम्यान सचिन पवार हा औरंगाबाद येथे एका खासगी कंपनीमध्ये काम करत होता. काही दिवसांपूर्वी तो खानापूर चित्ता येथे गावी आला होता. महालक्ष्मीच्या सणासाठी तो गावी थांबला. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. तर तेजस पाईकराव हा सर्प मित्र होता. त्यांना आतापर्यंत सुमारे दोनशे पेक्षा अधिक सापांना पकडून जीवदान दिले आहे. या आधी देखील या पुलावर चार जणांचा अपघातात मृत्यू झाला होता.

loading image
go to top