तिन्ही शासकीय रुग्णालयात दोनशे आयसोलेशन वार्ड

शिवचरण वावळे
Wednesday, 1 April 2020

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय तथा रुग्णालय, वजिराबाद येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय तथा रुग्णालय आणि महापालिकेसमोरील श्री गुरुगोविंदसिंघ स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालय या तिन्ही रुग्णालयात मिळून दोनशे आयसोलेशन वार्डची उभारणी करण्यात येणार आहे

नांदेड : परदेशासह पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती तसेच हैदराबाद अशा विविध ठिकाणाहून हजारो प्रवाशी नांदेडला दाखल झाले आहेत. आत्तापर्यंत सहा हजारापेक्षा अधिक प्रवाशांचे टेंम्परेचर तपासणी करण्यात आली आहे. यात अद्यापतरी एकही कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला नाही. मात्र, असे असले तरी, खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील तिन्ही शासकीय रुग्णालयात मिळून दोनशे आयसोलेशन वार्ड तयार करण्यात येणार आहेत. 

पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत खासगी डॉक्टर संघटनेच्या पदाधिकारी यांची बैठक बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. चर्चे दरम्यान जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांनी मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. पालकमंत्री श्री. चव्हाण यांच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून आयएमए संघटनेच्या पदाधिकारी यांनी शासनास सर्व ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार ता. एक एप्रिल रोजी पाच व्हेंटिलेटर तज्ज्ञ डॉक्टरांची टिम तयार करुन त्यांच्या मार्फत शहरातील तिन्ही शासकीय रुग्णालयात जाऊन त्या ठिकाणच्या डॉक्टरांना मार्गदर्शन करणार आहेत.

 हेही वाचा- श्री गुरुगोविंदसिंघजी स्मारक रुग्णालयासाठी तीन कोटीचा निधी मंजूर

या तिन्ही शासकीय रुग्णालयात वार्ड
विष्णुपुरी येथे असलेले डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय तथा रुग्णालय, वजिराबाद येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय तथा रुग्णालय आणि महापालिकेसमोरील श्री गुरुगोविंदसिंघ स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालय या तिन्ही रुग्णालयात मिळून दोनशे आयसोलेशन वार्डची उभारणी करण्यात येणार आहे. यात विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात शंभर तर आयुर्वेदिक रुग्णालय व श्री गुरुगोविंदसिंघ स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालयात मिळून प्रत्येकी पन्नास वार्ड तयार करण्यात येणार आहेत. यामध्ये किमान १५ ते २५ व्हेंटिलेटर असतील असेही सुत्राकडून सांगण्यात आले. 

हेही वाचले पाहिजे- नांदेड जिल्ह्यासाठी ३० हजार सुरक्षा किटची गरज

खबरदारी म्हणून व्हेंटिलेटरची संख्या वाढणार
जिल्हा शासकीय रुग्णालयात पाच, विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात पाच व इतर शासकीय रुग्णालयात असे मिळून कोरोनासाठी १० ते १५ व्हेंटीलेटर सुविधा उपलब्ध आहे. जिल्ह्यात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नसला तरी, भविष्यात खबरदारी म्हणून व्हेंटिलेटरची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे माहिती मिळाली आहे. 

 

व्हेंटीलेटर तज्ज्ञ डॉक्टर मदत करणार
नांदेड जिल्हा आयएमए संघटनेचे पदाधिकारी शासनास सर्व ती वैद्यकीय मदत करण्यास तयार आहेत. परंतु शासनाने देखील खासगी डॉक्टरांच्या सुरक्षेची हमी घेतली पाहिजे. त्यांना आवश्यक त्या आरोग्य सेवा सुविधा पुरविल्या गेल्या पाहिजे. पाच व्हेंटीलेटर तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. या पाच तज्ज्ञ डॉक्टरची टिम शासकीय रुग्णालयातील डॉक्टरना आवश्यक ते मार्गदर्शन करणार आहे.
-डॉ. सुरेश कदम अध्यक्ष आयएमए संघटना नांदेड ​
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Hundred Isolation Wards In Three Government Hospitals Nanded News