दोन लाख जणांनी भरले ऑनलाईन वीजबिल, लातुरात परिमंडळातील चित्र

सुशांत सांगवे
सोमवार, 6 एप्रिल 2020

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या राज्यात लॉकडाऊन असल्याने महावितरणच्या लघुदाब वर्गवारीतील ७३ लाख २९ हजार वीज ग्राहकांनी घरबसल्या गेल्या महिन्यात १२२७ कोटी २५ लाख रुपयांचा ऑनलाईन पद्धतीने वीजबिल भरणा केला आहे. यामध्ये लातुरात परिमंडळातून १ लाख ९२ हजार ग्राहकांनी ऑनलाईन वीजबिल भरणा केला आहे.

लातूर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या राज्यात लॉकडाऊन असल्याने महावितरणच्या लघुदाब वर्गवारीतील ७३ लाख २९ हजार वीज ग्राहकांनी घरबसल्या गेल्या महिन्यात १२२७ कोटी २५ लाख रुपयांचा ऑनलाईन पद्धतीने वीजबिल भरणा केला आहे. यामध्ये लातुरात परिमंडळातून १ लाख ९२ हजार ग्राहकांनी ऑनलाईन वीजबिल भरणा केला आहे.

सद्यःस्थितीत राज्यामध्ये कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुरु आहेत. येत्या १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र देखील बंद आहेत. मात्र वीजग्राहकांनी महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर, मोबाईल ॲप आणि इतर ऑनलाईन पर्यांयाद्वारे वीजबिलांचा घरबसल्या भरणा केला आहे. लातूरात दर महिन्याला एक ते सव्वा लाखापर्यंत ऑनलाईन वीजबिलाचा भरणा होतो. तो लॉकडाऊनमुळे सुमारे ७० हजारांनी वाढला असल्याचे दिसून येत आहे.

वाचा ः बाहेरगावावरून आलेल्यांनी माहिती न दिल्यास फौजदारी गुन्हा, लातूर...

मार्च महिन्यात राज्यातील ७३ लाख २९ हजार ग्राहकांनी घरबसल्या १२२७ कोटी २५ लाख रुपयांच्या वीजबिलांचा ऑनलाईन पद्धतीने भरणा केला. यामध्ये सर्वाधिक पुणे परिमंडलातील १३ लाख ५० हजार तर भांडूप परिमंडलातील ११ लाख वीजग्राहकांचा समावेश आहे. लॉकडाऊनमुळे महावितरणकडून २३ मार्चपासून वीजबिलांची कागदी छपाई व वितरण बंद करण्यात आले आहे. मात्र मोबाईल क्रमांकांची नोंदणी केलेल्या ग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे वीजबील पाठविण्यात येत आहे. याशिवाय संकेतस्थळ आणि मोबाईल ॲपवर वीजबिल पाहण्यासाठी व भरणा करण्याची सुविधा उपलब्ध आहे. या माध्यमातून वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

तहसीलदारांनी केले पंधरा दुचाकी, दोन रिक्षा जप्त
उदगीर (जि.लातूर) : कोरोना संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे शहरात विनाकारण फिरणाऱ्या पंधरा दुचाकी व दोन रिक्षा तहसिलदारांनी जप्त केल्या. दोन दिवसांपूर्वी निलंगा येथे सापडलेल्या आठ कोरोना संसर्गग्रस्त रुग्णांच्या पार्श्वभूमीवर उदगीर शहर व तालुक्यामध्ये सतर्कता पाळण्यात येत आहे. महसूल प्रशासन, पोलिस विभाग, आरोग्य विभाग व नगरपालिका सतर्क झाली आहे. अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यास सुरवात झाली आहे.

रविवारी (ता.पाच) तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी पालिकेचे मुख्याधिकारी भारत राठोड, शहर पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांना सोबत घेऊन सायंकाळच्या सुमारास शहरातील रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारक नागरिकांची कसून चौकशी सुरू केली. यात विनाकारण फिरत आहेत अशा पंधरा दुचाकी व दोन रिक्षा जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
शहरातील विविध गल्लीबोळात नगरपालिकेच्या वतीने मोठी खबरदारी घेण्यात आली असून निर्जंतुकीकरण करण्यासाठी आवश्यक त्या फवारण्या करण्यात येत आहेत. शहरातील मुख्य रस्त्यावर कोरोना संसर्गजन्य प्रतिबंधासाठी आवश्यक देण्यात आले आहेत. जेणेकरून नागरिकांमध्ये जनजागृती होईल.

शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून नगरपालिकेच्या वतीने काळजी घेण्याचे आवाहन मुख्याधिकारी राठोड हे वेगवेगळ्या पद्धतीने करत आहेत. निलंग्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. गरज असेल तरच घराबाहेर निघा. अन्यथा विनाकारण रस्त्यावर गर्दी करणे टाळावे असे आवाहन करण्यात येत आहे. पोलिस प्रशासनाच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यावर विविध ठिकाण नाकाबंदी लावण्यात आली असून फिरणाऱ्या नागरिकांची व वाहनांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Lack Customers Filled Electricity Bill Through Online, Latur