उस्मानाबाद : बापलेकीला मिळाली अध्यक्षपद भूषविण्याची संधी

राजेंद्रकुमार जाधव
बुधवार, 8 जानेवारी 2020

उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी एकाच कुटुंबातील दोघांना मिळाली आहे. वीस वर्षांपूर्वी शिवदास कांबळे यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले होते. आता त्यांची कन्या अस्मिता कांबळे यांची बुधवारी (ता. आठ) जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

उस्मानाबाद : एकाच कुटुंबांतील दोघांना उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी मिळाली आहे. वीस वर्षांपूर्वी शिवदास कांबळे यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले होते. आता त्यांची कन्या अस्मिता कांबळे यांची बुधवारी (ता. आठ) जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या इतिहासात बापलेकींनी अध्यक्षपद भूषविण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवड बुधवारी झाली. भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या समर्थक असलेल्या अस्मिता कांबळे यांची अध्यक्षपदी निवड झाली. तीन वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अस्मिता कांबळे या तुळजापूर तालुक्‍यातील मंगरुळ गटातून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निवडून आल्या आहेत. आमदार पाटील यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 26 पैकी 17 सदस्य आमदार पाटील समर्थक झाले. त्यात श्रीमती कांबळे यांचाही समावेश आहे. जिल्हा परिषदेत आमदार पाटील समर्थक सदस्यांची संख्या 17 आहे, तर भाजपचे चार सदस्य आहेत. 

हेही वाचा - दहा महिन्यांच्या बाळांसह ती झाली बेपत्ता, सापडल्यानंतर पतीला म्हणाली...

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षित आहे. पाटील समर्थक व भाजपच्या या गटाकडे अस्मिता कांबळे या एकमेव अनुसूचित जातीच्या सदस्य असल्याने साहजिकच त्यांची उमेदवारी निश्‍चित मानली होती. अपेक्षेप्रमाणे श्रीमती कांबळे यांनी उमेदवारी दिल्यानंतर त्या अध्यक्षपदी निवडूनही आल्या. आणि वडिलानंतर त्यांनाही जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी मिळाली. 

हेही वाचा - दहा महिन्यांच्या बाळांसह ती झाली बेपत्ता, सापडल्यानंतर पतीला म्हणाली...

अस्मिता कांबळे यांचे वडील शिवदास कांबळे यांनीही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून 21 मार्च 1998 ते 20 मार्च 1999 या कालावधीत काम पाहिले आहे. त्यावेळी श्री. कांबळे हे कॉंग्रेसकडून निवडून आले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेनंतर कालातंराने श्री. कांबळे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. श्री. कांबळे हे तुळजापूर तालुक्‍यातील मंगरुळ, काक्रंबा गटातून निवडून आले होते. त्यांना सभापती आणि अध्यक्षपदांवर काम करण्याची संधी मिळाली. 

अस्मिता कांबळे या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत तुळजापूर तालुक्‍यातील शहापूर गटातून निवडून आल्या होत्या. त्यानंतर यावेळच्या पंचवार्षिक निवडणुकीत त्या मंगरुळ गटातून निवडून आलेल्या आहेत. 20 वर्षांपूर्वी वडिलांनी अध्यक्ष म्हणून काम केलेल्या जिल्हा परिषदेमध्येच अस्मिता कांबळे यांनाही अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या इतिहासात बापलेकीला अध्यक्षपद भूषविण्याची ही पहिलीच वेळ आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two members of the same family had the opportunity to serve as chairmen