हिंगोलीतील बनावट नोटाप्रकरणी आणखी दोघांना अटक 

राजेश दारव्हेकर
Friday, 4 September 2020

हिंगोली शहरातील बनावट नोटाप्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाने छापखान्याचा पर्दाफाश केला. बनावट नोटा प्रकरणात दहशतवाद विरोधी पथकाने विदर्भातील पुसद येथून गुरुवारी (ता. चार) आणखी दोघांना अटक केली असून त्यांनी मागील तीन वर्षापासून विदर्भातही बनावट नोटा चलनात आणल्याचे चौकशीत स्पष्ट होत आहे. या कामगिरीबद्दल पोलिस अधिक्षक योगेशकुमार यांनी रामेश्वर वैंजने, ओमकांत चिंचोलकर व पथकाला प्रशस्तीपत्र व रोख पारितोषिक देऊन त्यांचा गौरव केला. 

हिंगोली : आनंदनगर भागातील बनावट नोटा प्रकरणात दहशतवाद विरोधी पथकाने विदर्भातील पुसद येथून गुरुवारी (ता. चार) आणखी दोघांना अटक केली असून त्यांनी मागील तीन वर्षापासून विदर्भातही बनावट नोटा चलनात आणल्याचे चौकशीत स्पष्ट होत आहे.
 
हिंगोलीतील आनंदनगर भागात बनावट नोटा छापणाऱ्या संतोष सुर्यवंशी (देशमुख) व छाया भुक्तार या दोघांना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी केली. त्यांच्या चौकशीमध्ये पुसद येथील दोघे जण त्यांच्यासोबत काम करीत असल्याची माहिती पुढे आली. 

हेही वाचा - कोरोनाची कुंटूर पोलीस ठाण्यात इंट्री : एक अधिकारी पाच कर्मचारी पाॅझिटिव्ह -

दोघांना केली पुसद येथून अटक 

पोलिस अधिक्षक योगेशकुमार, अतिरिक्त पोलिस अधिक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपाधिक्षक रामेश्वर वैंजने, सहायक पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकक व त्यांच्या पथकाने गुरुवारी (ता.तीन) मध्यरात्री पुसद येथे जाऊन शोध मोहिम सुरु केली. त्यानंतर सकाळी शेख इम्रान व विजय कुरुडे (रा. पुसद) यांना अटक केली. 

तीन वर्षापासून प्रकार 

दरम्यान, वरील दोघेही संतोष सुर्यवंशी (देशमुख) याच्या मागील तीन वर्षापासून संपर्कात होते. तीन वर्षापासून ते बनावट नोटा घेऊन विदर्भात चलनामध्ये आणत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांनी पुसद येथे आणखी काही जणांना नोटा दिल्या काय? याची चौकशी पोलिसांनी सुरु केली तर यामध्ये आणखी काही जण सहभागी असून त्यांच्या शोध घेण्यासाठी पोलिसांची चार पथके रवाना झाली आहेत. कामगिरीबद्दल पोलिस अधिक्षक योगेशकुमार यांनी उपाधिक्षक रामेश्वर वैंजने, सहायक पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व पथकाला प्रशस्तीपत्र व रोख पारितोषिक देऊन त्यांचा गौरव केला.

येथे क्लिक करा घराबाहेरच्या भागात शाळा बंद, शिक्षण सुरू, काय आहे उपक्रम -

असा घडला प्रकार 

शहरालगत आनंदनगर भागात अरुण हनवते यांच्या घरात भाड्याने राहणारा एकजण महिलेसह इतर काहींच्या साथीने बनावट नोटा छापून त्या चलनात आणत असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैंजने यांना मिळाली. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी काल रात्री सापळा लावला. आनंदनगर भागातील अरुण हनवते यांच्या घरामध्ये भाड्याने राहणारा संतोष सूर्यवंशी (देशमुख) याच्या खोलीवर छापा टाकला. त्यावेळी प्रिंट केलेल्या १००, २००, ५००, दोन हजाराच्या सुमारे १७ लाख ४७ हजार ३५० रुपयांच्या नकली नोटा, वीस हजारांच्या खऱ्या नोटा, स्कॅनिंग- झेरॉक्स यंत्र, प्रिंटर, नोटा तयार करण्यासाठीचे सहित्य, धातूच्या महालक्ष्मी देवीच्या १६ मूर्ती, कार असा एकूण २४ लाख ३० हजार ३२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

संपादन - राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two more arrested in Hingoli counterfeit note case hingoli news