esakal | कुंडात बुडून दोन युवकांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

याेगेश भाेंगळे

कुंडात बुडून दोन युवकांचा मृत्यू

sakal_logo
By
राजेंद्र भाेसले

कन्नड, ता. 1 (जि.औरंगाबाद) ः पितळखोरा लेणी (ता. कन्नड) येथील कुंडात बुडून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. एक) दुपारी दीडच्या सुमारास घडली. आंबातांडा (ता. कन्नड) येथील युवक योगेश विलास भोंगळे (वय 20) आणि मुंडवाडी (ता. कन्नड) येथील शरद रामचंद्र साळुंके ( वय 22) हे दोघे औरंगाबाद येथून आले होते. दोघेही आते मामेभाऊ आहेत.

दुपारी आंबातांडा येथे योगेश याच्या घरी जाऊन नंतर पितळखोरा येथे गेले. दुपारी दीडच्या सुमारास दोघेही पितळखोरा येथील पाण्याच्या कुंडाकडे गेले होते. त्यातच दोघेही पाण्यात पडल्याचे एका पर्यटक महिलेने बघितले. त्या महिलेने तत्काळ या घटनेची माहिती तेथील इतर नागरिकांना दिली. नागरिकांनी घटनेची माहिती कन्नड ग्रामीण पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक सुनील नेवसे, पोलिस जमादार सोनवणे, श्री. शिंपी, पोलिस कॉन्स्टेबल, पोलिस पाटील साहेबराव तावरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन कुंडात शोधकार्य सुरू केले. दोघेही युवक पाण्यात बुडालेले असल्याने युवकांना बाहेर काढण्यासाठी दोन तास लागले. दोन तासांत दोन्ही युवकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. वनविभागाच्या तपासणी नाक्‍यावरील पावतीवरून दोघांची ओळख पटली. त्यांना कन्नड येथील ग्रामीण रुग्णालयात तपासासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पवार यांनी तपासून मृत घोषित केले. दोघांची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक नेवसे करीत आहेत.

धोकादायक कुंडाचा प्रश्न ऐरणीवर

पितळखोरा खोरा या पर्यटनस्थळी असलेल्या या धोकादायक कुंडात पडून गेल्या काही वर्षांपासून अनेक घटना घडल्या आहेत. मागच्या वर्षात याच दिवसात औरंगाबाद येथील महाविद्यालयीन तरुण, तरुणी सेल्फी काढताना पाय घसरून कुंडात पडून मुत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या होत्या. सतत पाणी वाहत असल्याने कुंडाच्या आजूबाजूची जागा शेवाळून निसटती झाली आहे. या कुंडाच्या आजूबाजूला वनविभागाने संरक्षक कडे किंवा तारेचे कुंपण लावण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

शवविच्छेदनासाठी टाळाटाळ
दोन्ही युवकांना कन्नड ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उत्तरीय तपासणी करण्यासाठी शॅडो लाईट नाही, व्यवस्था नाही असे कारण सांगत टाळाटाळ केली; मात्र काही पत्रकारांसह इतरांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वरिष्ठांना माहिती देऊन सदर वैद्यकीय अधिकारी टाळाटाळ करीत आल्याचे सांगितले. त्यांनतर वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पवार हे आले. त्यांनी व डॉ. नीलेश आहेर यांनी उत्तरीय तपासणी केली.

loading image
go to top