
'कलासंस्कृतीचा' मळवट भरल्याशिवाय मराठी अभिजात होणार नाही
उदगीर : मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळण्यासाठी साहित्या सोबतच कला संस्कृती जोपासणे आवश्यक आहे. दिवसेदिवस लोप पावत चाललेल्या महाराष्ट्राच्या कला संस्कृतीचा मळवट भरल्याशिवाय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार नसल्याची खंत प्रसिद्ध लोककला अभ्यासाक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांनी व्यक्त केली आहे.
९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शनिवारी मुख्य व्यासपीठावर आयोजित महाराष्ट्र महोत्सव या सांस्कृतिक कार्यक्रमात ते बोलत होते. संमेलनाचे स्वागताध्यक्ष राज्यमंत्री संजय बनसोडे कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर प्रमुख कार्यवाह रामचंद्र तिरुके हे उपस्थित होते.
यावेळी डॉ खांडगे म्हणाले मराठी भाषा ही महाराष्ट्राची वैभव आहे. या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे, हे जरी खरे असले तरी महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीतील पारंपारिक लोककला लावणी, भारुड, पोवाडे यांची जोपासना साहित्या बरोबरीने झाली पाहिजे. साहित्यातून या लोकसंस्कृतीचा जागर झाला पाहिजे. लोकसंस्कृती टिकली पाहिजे वाढली पाहिजे महाराष्ट्राच्या परंपरेनुसार ती नव्या पिढीच्या मनामनात रुजली पाहिजे जोपासली पाहिजे. यासाठी साहित्यिकांनी साहित्यातून लोकसंस्कृती टिकविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
मात्र ९५ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर शनिवारी सादर झालेल्या महाराष्ट्र महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या वेळी साहित्य झोपले... अनं लोककला जागे राहीली.. कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतर हळूहळु साहित्यिकांनी सभागृहातून काढता पाय घेतला व निघून गेले पण लोकसंस्कृतीचे पाईक असणाऱ्या दर्दीवंत रसिकप्रेक्षकांनी टाळ्यांची दाद देत लोककलांचा जागर घातला. मग मराठी अभिजात कशी होणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित करून साहित्याबरोबरच लोकसंस्कृतीचाही जागर झाला तरच मराठी ही राजभाषा अभिजात होऊ शकते असे मत त्यांनी व्यक्त केले.
साहित्य झोपले, संस्कृती जागे राहिली...
शनिवारी अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर सादर झालेल्या महाराष्ट्र महोत्सव या लोककलेच्या कार्यक्रमाच्या वेळी साहित्यिकांनी काढता पाय घेतला. भारदार लोककलावंतांच्या या कार्यक्रमाला उदगीर परिसरातील लोककलेची दर्दी असणाऱ्या रसिकप्रेक्षकांनी या कलावंतांना दाद देत संबंध महाराष्ट्राच्या पारंपारिक लोककलांचा आस्वाद घेतला. मात्र साहित्यिकांनी याकडे पाठ फिरवल्याने कलावंत व रसिकानी खंत व्यक्त केली.
Web Title: Udgir Art Culture Maharastra Festival Program Language Elite
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..