
लातूर जिल्ह्यातील उजनी (ता.औसा) येथे मंगळवारी (ता.एक) आरोग्य विभागाकडून करण्यात आलेल्या ७० जलद अँटिजेन चाचण्यांपैकी २८ व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
उजनी (जि.लातूर) : उजनी (ता.औसा) येथे मंगळवारी (ता.एक) आरोग्य विभागाकडून करण्यात आलेल्या ७० जलद अँटिजेन चाचण्यांपैकी २८ व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यावरुन येथे वेगाने कोरोना संसर्ग होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्या अनुषंगाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गावातील लोकप्रतिनिधींकडून पुढील पाच दिवस जनता संचारबंदी लागू करण्याचे आवाहन केले आहे.
येथील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मंगळवारी जिल्हा परिषद शाळेमध्ये कंटेनमेंट झोनमधील लोकांची कोरोना जलद अँटिजेन चाचणी करण्यात आली. यामध्ये एकूण ७० व्यक्तींची चाचणी केली असता त्यापैकी २८ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. २८ पैकी चार रुग्ण काजळे चिंचोली (ता.औसा) येथील असून उर्वरित २४ रुग्ण हे उजनीतील आहेत.
उस्मानाबादकरांसाठी आनंदाची बातमी, आस्थापना सायंकाळी पाचपर्यंत राहणार सुरु
सर्व बाधित रुग्णांना पुढे औसा येथे हलविण्यात येणार असल्याची माहिती येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.रेवनाथ देवणीकर यांनी दिली. दरम्यान, उजनीमध्ये दोन प्रतिबंधित क्षेत्र असून येथील १६ रुग्णांवर औसा येथे उपचार सुरू आहेत. त्याच कंटेनमेंट झोनमधील एकूण ७० व्यक्तींची आज आज जलद अँटिजेन चाचणी करण्यात आली. त्यापैकी २४ व्यक्तींना लागण झाल्याचे आढळून आले. त्यामुळे येथील एकूण रुग्णांची संख्या ४५ वर पोचली आहे.
उजनी हे गाव आता कोरोना उद्रेकाचे ठिकाण बनले असून येथील ग्रामस्थांमध्ये कमालीची भीती पसरली असल्याचे दिसून येत आहे. येथील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गावातील लोकप्रतिनिधींनी गावकऱ्यांशी चर्चा करून पुढील पाच दिवस जनता संचारबंदी लागू करण्याचे आवाहन यावेळी येथील ग्रामस्थांना केले. या काळात अत्यावश्यक सेवेतील आस्थापना दवाखाना, औषधालये आदी सोडून बाकी सर्व आस्थापना बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले. या दरम्यान कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये. व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवावीत. लक्षणे आढळून आल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधावा व प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य नारायण लोखंडे, औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती योगीराज पाटील, श्रीरंग वळके, धनराज लोखंडे यांच्यासह आरोग्य व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
बिरवलीमध्ये ही कोरोनाचा शिरकाव
बिरवली (ता. औसा) येथे आज एका २३ वर्षीय तरुणाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून रुग्णाच्या संपर्कातील दहा व्यक्तींना तपासणीसाठी औसा येथे पाठवण्यात आले आहे. तसेच रुग्णाच्या घराचा परिसर प्रशासनाकडून सिल करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे.
बालविवाह रेणापूरच्या तहसीलदारांनी रोखला, वधुवराच्या कुटुंबीयांचे केले समुपदेशन
(संपादन - गणेश पिटेकर)