
उजनी : महामार्गालगतच्या पाण्याचा प्रश्न कायम
उजनी : येथील औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या पाण्याचा प्रश्न काही केल्या मिटत नसल्याचे दिसून येत आहे. मागिल वर्षी प्रकल्प संचालकांकडून परिस्थितीची पाहणी करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी याबाबत उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते. याला वर्ष लोटले असून दुसरा पावसाळा तोंडावर आहे. मात्र याबाबत कोणतीही उपाययोजना करण्यास महामार्ग प्रशासन असमर्थ राहिले आहे. दरम्यान अतिरिक्त पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीमुळे येथील ग्रामस्थ आता चिंतेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
उजनी (ता. औसा) येथील ग्रामस्थांना दोन ते तीन वर्षापासून पावसाळयात एका समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ती म्हणजे येथून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ लगतच्या अतिरिक्त पाण्यामुळे. या रस्त्याचे चौपदरीकरण झाल्यानंतर रस्त्यालगतच्या शेतातील पाणी जवळच्या तेरणा नदीत जाण्यासाठी मार्गच काढून दिला नसल्याने हे पाणी उजनी मोडवरील रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर वहायला लागून रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त होते. परिणामी येथील विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, प्रवाशी आदींना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागतो.
एवढंच नाही तर पुढे हे पाणी या परिसरातील घरांनी शिरते. यामुळे येथील जनजीवन पूर्णतः विस्कळित होत आहे.विशेष बाब म्हणजे पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या या परिस्थितीची कल्पना खासदार, आमदार तसेच महामार्ग प्रशासनाला असून देखील त्यांचे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान याहीवर्षी अशीच परिस्थिती निर्माण झाल्यास महामार्ग प्रशासनाच्या विरोधात मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याचे येथील ग्रामस्थानी सांगितले.
Web Title: Ujjani Highway Bridge Water Problem Inconvenience Citizens Rainy Season
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..