‘एटीएम’ जळीतप्रकरणात चोरट्यांचा बेबनाव उघडकीस !

file photo
file photo

परभणी : स्टेडियमजवळील भारतीय स्टेट बँकेच्या जाळलेल्या ‘त्या’ ‘एटीएम’मध्ये आरोपीने एकछदामही भरला नसल्याचे मंगळवारी (ता.दहा) ‘एटीएम’सह ‘सीडीएम’मशीनमधील रकमेच्या तपासणीनंतर समोर आले. दरम्यान, जळालेल्या ‘एटीएम’ व ‘सीडीएम’ मशीनमध्ये असलेली काही रक्कम व्यवहारा योग्य राहिली नसल्याचे नवामोंढा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामेश्वर तट यांनी म्हटले आहे.

परभणी शहर व परिसरात एटीएम मशीन जळाले नसून जाळल्याची बाबसमोर येताच तीन ‘एटीएम’, दोन ‘सीडीएम’ मशीन असलेले भारतीय स्टेट बँकेचे ‘ई-कॉर्नर’ (एटीएम केंद्र) नेमके का जाळले?, याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. स्टेडियम परिसरात असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या एटीएमला बुधवारी (ता.चार) पहाटे दोनच्या सुमारास जळाले होते. ‘एटीएम’ला आग लागल्याची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आग नियंत्रणात आणली. मात्र, आगीत भारतीय स्टेट बँकेचे ‘ई-कॉर्नर’मधील दोन ‘सीडीएम’ मशीनसह तीन एटीएम मशीन जळून खाक झाले. घटना घडल्यानंतर नवामोंढा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामेश्वर तट यांनी ‘एटीएम’मधील ‘सीसीटीव्ही’ फुटेज तपासले असताना त्यात रात्री दोनच्या सुमारास मोटारसायकलवर आलेल्या व्यक्तीने पेट्रोल टाकून ‘एटीएम’ मशीन जाळल्याचे दिसून आले. त्यावरून बँकेच्या अधिकाऱ्यांनी अज्ञात व्यक्तीने एटीएम जाळल्याचे तक्रारीत नमूद केले. १३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे म्हटले होते.

‘सीसीटीव्ही’फुटेजच्या आधारे आरोपी ताब्यात

पोलिस निरीक्षक रामेश्वर तट यांनी ‘सीसीटीव्ही’ फुटेजच्या आधारे तपास करीत नंदकुमार गोपाळराव पुरी व गोविंद रामेश्वर अंभोरे (दोघेही रा. संजय नगर,बोरी, ता. जिंतूर) या आरोपीस ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने आपण ‘एटीएम’ जाळले. सीडीएम मशीनमध्ये एक लाख ४४ हजार रुपये आपण टाकले. मात्र, एवढी मोठी रक्कम टाकल्यानंतर आपल्याला मशीनमधुन रिसीप्ट आली नाही की, मोबाईलवर मॅसेजही आला नाही. त्यामुळे आपण बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी आपल्याला प्रतिसाद दिला नाही. एवढी मोठी रक्कम मशीनमध्ये टाकल्यानंतरही मॅसेज आला नाही. खात्यात रुपये जमा झाले नसल्याने आपण रागाच्या भरात एटीएम जाळल्याचे चौकशी दरम्यान, पोलिसांना सांगितले.
 

‘एटीएम’ व ‘सीडीएम’ मशीन उघडले
पोलिस निरीक्षक रामेश्वर तट यांनी त्यास न्यायालयासमोर हजर केले असता त्यास सहा दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली होती. यादरम्यान त्याची कसून चौकशी पोलिस करीत होते. तर दुसरीकडे त्याने सीडीएम मशीनमध्ये मोठी रक्कम टाकल्याचे सांगत आहे. आणि रिसिप्टही मिळाली नसल्याचे सांगत असल्याने पोलिसांनी बँक अधिकाऱ्यांना तेथील एटीएम उघडण्याचे सांगितले होते. मात्र, आगीत पूर्ण खाक झालेले एटीएममधील पैसे टाकण्याचे लॉकर बँक अधिकाऱ्यांना उघडता येत नसल्याने त्यांनी वरिष्ठांशी सल्लामसलत केली. त्यानंतर मंगळवारी (ता.दहा) बँकेचे एटीएम उघडण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी पोलिस निरीक्षक रामेश्वर तट, कर्मचारी श्री.चाटे, वैजनाथ तांबोळी यांच्यासह बँकेच्या अधिकाऱ्यांसमक्ष एटीएम उघडले. 

दोन्ही मशीन मधील रक्कम मोजली
अधिकाऱ्यांनी एटीएम केंद्र जळाल्याच्या घटनेपूर्वी ज्या ‘एटीएम’मध्ये पैसे टाकले होते व त्याचबरोबर तेथे लावलेल्या नवीन ‘सीडीएम’मध्ये आपण पैसे टाकल्याचे आरोपी सांगत असल्याने ते सर्व ‘एटीएम’ व ‘सीडीएम’ मशीन मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास उघडण्याचे प्रयत्न सुरू केले. सायंकाळी पाचच्या सुमारास दोन्ही मशीन उघडण्यात यश आल्यानंतर त्यातील रक्कम पोलिसांसमक्ष अधिकाऱ्यांनी मोजली. त्यावेळी संबंधीताने रक्कमच ‘सीडीएम’ मशीनमध्ये टाकली नसल्याचे निदर्शनास आले. कारण पैसे टाकल्यापासून जळण्यापूर्वीपर्यंतचे बँकेकडे प्राप्त झालेल्या संपूर्ण रेकॉर्डनुसार व मशीनमध्ये असलेल्या रकमेची तपासणी केल्यानंतर आरोपीने रक्कम भरलीच नसल्याची बाब समोर आली.


 

रक्कम वापरण्यास अयोग्य
 

 पैसे असलेले सर्व मशीन मंगळवारी उघडण्यात आले. त्यातील रक्कमेची मोजदाद करण्यात आली. आरोपीने पैसे नक्की टाकले का?, याची खातरजमा करण्यासाठीच ‘एटीएम’ उघडण्यात आले होते. त्यात रक्कम त्याने टाकलीच नसल्याने निदर्शनास आले. मात्र, तेथील सर्वच मशीनमधील अर्धी अधिक रक्कम वापरण्यायोग्य राहिली नसल्याची माहिती पोलिस निरीक्षक  रामेश्वर तट यांनी ‘सकाळ’शी बोलता दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com