धक्कादायक : सतत रडत असल्याने मामाने केला तेरा दिवसांच्या भाचीचा खून

प्रशांत शेटे
Sunday, 30 August 2020

लातूर जिल्ह्यातील झरी (बु) (ता.चाकूर) येथे एका तेरा दिवसांच्या गोंडस मुलीचा पाण्याच्या टाकीत टाकून खून करण्यात आल्याची घटना शनिवारी (ता.२९) घडली असून मुलगी सतत रडत असल्यामुळे मामानेच तिचा खून केल्याचे पोलिस तपासात रविवारी (ता.३०) उघडकीस आले आहे.

चाकूर (जि.लातूर) : लातूर जिल्ह्यातील झरी (बु) (ता.चाकूर) येथे एका तेरा दिवसांच्या गोंडस मुलीचा पाण्याच्या टाकीत टाकून खून करण्यात आल्याची घटना शनिवारी (ता.२९) घडली असून मुलगी सतत रडत असल्यामुळे मामानेच तिचा खून केल्याचे पोलिस तपासात रविवारी (ता.३०) उघडकीस आले आहे. हुडगेवाडी (ता.चाकूर) येथील पुजा विनोद काळे ही महिला बाळंतपणासाठी झरी (बु) येथील माहेरी आली होती. तेरा दिवसांपूर्वी तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला होता.

लातूरच्या रेल्वेबोगी कारखान्यात डिसेंबरपासून प्रत्यक्ष निर्मिती, रोजगार होणार...

शनिवारी सकाळी अचानक घरातून ही मुलगी गायब झाली. यामुळे घरातील व्यक्तींनी मुलीचा शोध घेतला, परंतु ती कुठेही आढळून आली नाही. काही वेळानंतर घरातील एक व्यक्तीं पाण्याच्या टाकीचे झाकण काढून पाणी काढत असताना त्याचा मुलीचा मृतदेह आढळून आला. याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी विद्यानंद काळे, पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली होती.

पोलिसांनी याचा अधिक तपास केला असता मुलगी रात्री सतत रडत असल्यामुळे मामा कृष्णा अंकुश शिंदे यांने रागाच्या भरात मुलीला पाण्याच्या टाकीत टाकल्याचे उघड झाले आहे. सदरील आरोपीचे वय २० वर्ष इतके आहे. याबाबत पोलीस हवालदार प्रशांत भंडे यांच्या फिर्यादीवरून मामा कृष्णा शिंदे याच्या विरूध्द रविवारी (ता.३०) सायंकाळी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्री.चव्हाण यांनी दिली.

सोयाबीनवर करपा, तांबेरा रोगाचा प्रादूर्भाव; उत्पादनात घट होण्याची भीती

देवणी तालुक्यात १९३ कोरोनाग्रस्त
देवणी  तालुक्यात आतापर्यंत कोरोनामुळे बारा जणांचा मृत्यू झाला. रविवारी (ता. ३०) बारा जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या १९३ वर गेली आहे. रविवारी सय्यदपूर येथील पाच, तर हेळंब येथील सात अशा बारा रुग्णांना कोरोनाची लागण झाली. आतापर्यंत सोळा शासकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहगे. यात पंचायत समिती चार, नगरपंचायत दोन, ग्रामीण रुग्णालय पाच, तहसील कार्यालय दोन, वनविभाग एक, तर एक बँक कर्मचारी व एक रेशन दुकानदारालाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आजारी व्यक्तीने इतर व्यक्तींशी थेट संपर्क टाळावा. शिवाय दवाखान्यात उपचारासाठी जाताना आवश्यक सर्व प्रकारची खबरदारी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार सुरेश घोळवे यांनी केले.

(संपादन - गणेश पिटेकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uncle Murdered Thirteen Day Olds Girl Chakur News