Marathwada : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गुरुवारी लातूर दौऱ्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nitin Gadkari

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गुरुवारी लातूर दौऱ्यावर

लातूर : केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी गुरुवारी (ता.२५) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व भाजपतर्फे दौऱ्याची जय्यत तयारी सुरू आहे. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर (टाऊन हॉल) त्यांच्या जाहीर सभेचेही नियोजन केले जात आहे. यावेळी महामार्गाच्या कामांचे लोकार्पण, काही कामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. यानिमित्ताने लातूरकरांना नव्या महामार्गांची आस लागली असून, गडकरी यांचा दौरा जिल्ह्यातील खडतर रस्त्यांचे जाळे मजबूत करण्यासाठी फलदायी ठरण्याचे संकेत मिळत आहेत.

गडकरी यांच्या दौऱ्याला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता गौरीशंकर स्वामी यांनी दुजोरा दिला. जिल्ह्यासाठी सर्वांत महत्त्वाच्या, मोठी वाहतूक असलेल्या लातूर- बार्शी रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले होते. देशभरात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विणले जात असताना हा रस्ता मागे कसा पडला, असा प्रश्न होता. अरुंद रस्ता, खोल साइडपट्ट्या, रस्त्यावरील खड्ड्यांनी अनेकांना जीव घेतला. रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून दुचाकी प्रवास धोक्याचा बनला आहे. रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत सातत्याने चर्चा व्हायची. कामाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले जात होते.

प्रत्यक्षात काही होत नव्हते. एप्रिलमध्ये गडकरी यांनी रस्त्याच्या काही टप्प्याचे काम मंजूर करून निधी उपलब्ध केला. गेल्या आठवड्यात रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आणि लातूरकरांचा आनंद गगनात मावेनासा झाला. रस्त्याचे केवळ सहा किलोमीटरच नव्हे तर येडशीपर्यंत तातडीने पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली. आता गडकरींच्या दौऱ्यामुळे अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत.

‘लिंक हायवे’चीही आशा

जिल्ह्यातून समृद्धी महामार्गासारखा एखादा मोठा राष्ट्रीय महामार्ग नेण्याबाबतही गडकरी घोषणा करू शकतात, अशी आशा व्यक्त होत आहे. यासोबत काही लिंक हायवेही प्रस्तावित होऊ शकतात. दौऱ्याच्या निमित्ताने मुरूडमार्गे अंबाजोगाई ते अक्कलकोट, देवणी, शिरूर अनंतपाळ व आरीमोडमार्गे देवणी ते निटूर, निलंगा ते लामजना, बोरफळ फाटा ते उस्मानाबाद, शिरूर ताजबंद ते उदगीर या रस्त्यांच्या रुंदीकरणासह लातूर शहरातील साईनाका ते गरूड चौक आणि उदगीर बायबास रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. मसलगा (ता. निलंगा) येथील आधुनिक पुलाचे लोकार्पणही गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.

loading image
go to top