
भोकरदन शहरातील नवीन भोकरदन भागात असलेल्या मतदान केंद्रावर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्या कुटूंबासह जाऊन मतदानाचा हक्क बजावला.
भोकरदन (जि.जालना) : मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी भोकरदन तालुक्यातील १६ मतदान केंद्रांवर मंगळवारी (ता.एक) सकाळी आठ वाजल्यापासून शांततेत सुरुवात झाली आहे. भोकरदन शहरातील नवीन भोकरदन भागात असलेल्या मतदान केंद्रावर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्या कुटूंबासह जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष संतोष दानवे व निर्मलाताई रावसाहेब दानवे यांनीही शारीरिक अंतराचे पाळून मतदान केले. या निवडणुकीसाठी तालुक्यात १६ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येत आहे.
त्यात एकूण ३ हजार ९०५ मतदार असून, पुरुष मतदार ३ हजार ३२७ तर महिला मतदार ५७८ आहे. शहरातील मतदान केंद्रावर राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांनी भेट देत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार चंद्रकांत दानवे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी सभापती लक्ष्मण दळवी, उपनगराध्यक्ष इरफान सिद्दीकी, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष प्रा.अंकुश जाधव, पालिका सभापती अब्दुल कदिर, शिवसेनेचे भूषण शर्मा, महेश पुरोहित, नगरसेवक नसीम खान पठाण, संतोष अन्नदाते, शेख नजीर, शब्बीर कुरेशी, रमेश जाधव आदींची उपस्थिती होती. दरम्यान निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्वच मतदान केंद्रांवर तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
संपादन - गणेश पिटेकर