कृषी विद्यापीठाचा शेतकऱ्यांशी  ऑनलाइन संवाद

कैलास चव्हाण
बुधवार, 8 एप्रिल 2020

शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी कृषी तंत्रज्ञान माहिती  केंद्राने ‘झूम कुल्ड मिटिंग’ या ॲपचा उपयोग करण्यास सुरवात केली आहे. केंद्राचे व्यवस्थापक डॉ. यू. एन. आळसे व डॉ. एस. बी. पुरी यांच्या पुढाकारातून बुधवारी (ता. आठ) दुपारी ११ ते १२ या वेळेत ऑनलाइन संवाद कार्यक्रम पार पडला. 

परभणी : लॉकडाउनच्या काळात शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये आणि सध्या परिस्थितीमध्ये पिकांची काळजी कशी घ्यावी यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राने बुधवारी (ता. आठ) मोबाइल ॲपद्वारे थेट घरबसलेल्या शेतकऱ्यांशी ऑनलाइन संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
कोरोना विषाणुळे लॉकडाउन सुरू आहे. त्याचा परिणाम सर्वच घटकांवर होत आहे. शेती कामावरदेखील विपरीत परिणाम होत असल्याने शेतकरी हतबल झालले आहेत. अनेक शेतकऱ्यांची बागायती शेती आहे. त्यामुळे फळबागांसह बागायती पिकांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. लॉकडाउन काळात घराबाहेर पडता येत नसल्याने कीड, पाणी व्यवस्थापन आदींबाबत मार्गदर्शन घेण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठात येणे शक्य नाही. तसेच विद्यापीठातदेखील सुट्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी कृषी तंत्रज्ञान माहिती  केंद्राने ‘झूम कुल्ड मिटिंग’ या ॲपचा उपयोग करण्यास सुरवात केली आहे. केंद्राचे व्यवस्थापक डॉ. यू. एन. आळसे व डॉ. एस. बी. पुरी यांच्या पुढाकारातून बुधवारी (ता. आठ) दुपारी ११ ते १२ या वेळेत ऑनलाइन संवाद कार्यक्रम पार पडला. 
यामध्ये बीड, उस्मानाबाद, वाशीम, हिंगोली, परभणी जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ऊस, भुईमूग या पिकांसह संत्रा, मोसंबी, डाळिंब, केळी या फळबागांचे पाणी व्यवस्थापन, कीड व्यवस्थापन यावर शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना डॉ. आळसे, प्रा. डी. डी. पटाईत, डॉ. के. पी. दौंडे यांनी उत्तरे दिली. तसेच विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रवीण कापसे यांनी भारतीय अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्या सूचनांची माहिती दिली.

हेही वाचा - कोरोना : १७४ जणांचे अहवाल निगेटिव्ह

दर अठवड्याला होणार संवाद
सध्या परिस्थिती पाहता लॉकडाउन उठण्याची शक्यता कमी असल्याने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी घरबसल्या ऑनलाइन संवाद कार्यक्रम दर अठवड्याला घेतला जाणार आहे. प्लेस्टोरमधील ‘झूम क्लुड मिटिंग’ या अपॅवर जाऊन विद्यापीठाने दिलेला पासवर्ड टाकताच या ऑनलाइन मिटिंगमध्ये शेतकऱ्यांना सहभागी होत येत आहे. दर रविवारी सोशल मीडियावर पासवर्ड देण्यात येणार आहे.

‘फळबाग’ विषयावर संवाद 
शेतकऱ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी विद्यापीठाने हा उपक्रम सुरू केला आहे. पुढील अठवड्यात फळबाग या विषयावर संवाद होणार आहे. शेतकऱ्यांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
- डॉ. यू. एन. आळसे, व्यवस्थापक, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र
...
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: University of Agriculture with farmers Online communication,parbhani news