Coronavirus : बीड शहरातील संचारबंदी शिथिल

दत्ता देशमुख
Friday, 10 July 2020

शहरात ११ कंटेनमेंट झोन : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश 

बीड  : शहरात ता. एक ते नऊ जुलैपर्यंत संचारबंदी लागू केली होती. शुक्रवारपासून (ता. १०) ही संचारबंदी शिथिल करण्यात आली. झमझम कॉलनी व शहेनशहानगर भागात लागू केलेला कंटेनमेंट झोनही शिथिल करण्यात आला; मात्र रुग्ण आढळलेल्या शहरातील ११ भागांत कंटेनमेंट झोन जाहीर करून पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले. 

लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर बाजारपेठांमध्ये गर्दी दिसून आली. काही व्यापारी आस्थापनांकडून फिजिकल डिस्टन्सिंग आणि इतर उपाययोजनांची ऐशीतैशी असे चित्रही पुन्हा दिसत आहे. दरम्यान, शहरातील विविध अकरा ठिकाणी कोरोनाबाधित झालेले रुग्ण आढळल्याचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी दिला. त्यामुळे या भागांत कंटेनमेंट झोन जाहीर केले. 

हेही वाचा- कोरोनाचे सर्वच रेकॉर्ड जपून ठेवा, खंडपीठ करणार पाहणी  

शनिवारी व रविवारीही बँका सुरू 
मागच्या एक ते नऊ तारखेपर्यंत संचारबंदी असल्याने सर्वच बँका बंद होत्या. त्यामुळे नागरिकांची पीककर्ज व इतर बँकेशी संबंधित कामे मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत. नागरिकांची गैरसोय टाळण्याकरिता शनिवारी (ता. ११) व रविवारी (ता. १२) या सुट्यांच्या दिवशीही शहरातील सर्व बँका त्यांच्या कार्यालयीन वेळेप्रमाणे सर्व ग्राहकांसाठी सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. दुसरा शनिवार असल्याने सुटी व रविवारची आठवड्याची सुटी होती; मात्र दोन्ही दिवशी बँका सुरू ठेवण्याचे आदेश दिले. 

हेही वाचा- आमदार कुचे यांच्यासह भाऊ, युवतीविरोधात गुन्हा दाखल, युवतीकरवी भाच्यालाच पाठविले अश्लिल संदेश 
 
बीडमधील या भागांत कंटेनमेंट झोन 

  • इंद्रप्रस्थ कॉलनी येथील शेख महेमूद शेख मसूद यांच्या घरापासून शेख ताजोद्दीन यांच्या घरापर्यंतचा परिसर. 
  • सय्यद सिराजुद्दीन सय्यद खुदबोद्दीन यांच्या घरापासून शेख मतीन मोहम्मद उस्मान यांच्या घरापर्यंतचा परिसर. 
  • बीड मसला येथील आयेशा किराणा (शेख इब्राहिम मोहम्मद) यांच्या घरापासून अब्दुल मुजीब अब्दुल वाहेद मोमीन यांच्या घरापर्यंत आणि औटे गल्ली (थिगळे गल्लीजवळील)
  • अखिलोद्दीन सरदार इनामदार यांच्या घरापासून ते विशाल विजयकुमार थिगळे यांच्या घरापर्यंतचा परिसर. 
  • पांडे गल्ली बालाजी मंदिराजवळ येथील गणेश बलदवा यांच्या घरापासून बाबूराव माणिकराव धायगुडे यांच्या घरापर्यंत. 
  • डीपी रोडवरील बीएसएनएल ऑफिसजवळ बारकुल हॉस्पिटलपासून ते आजिनाथ नवले यांच्या घरापर्यंतचा परिसर. 
  • परवानानगर खंडेश्वरी रोड येथील महारुद्र नागनाथआप्पा माडेकर यांच्या घरापासून श्रीदत्त मंदिरापर्यंतचा परिसर. 
  • विद्यानगर पश्चिममधील घुमरे कॉम्प्लेक्स, गोविंदनगर येथील बळीराज कॉम्प्लेक्सपासून ते गोपाळ अपार्टमेंटपर्यंत. 
  • मोमीनपुरा येथील सागर कटपीस सेंटर (रफिक सेट) पासून ते फातेमा बुक डेपो (मुक्ती कौसर सादती) पर्यंतचा परिसर. 
  • राजुरी वेस ते कोतवाली वेस यामध्ये कारंजा, अजीजपुरा, बलभीम चौक, छोटी राज गल्ली, काळे गल्ली व जुना बाजार. 

 

(संपादन : विकास देशमुख) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unlock in Beed