उदगीर, जळकोट, रोहिण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

युवराज धोतरे / शिवशंकर काळे/उद्धव दुवे
सोमवार, 6 एप्रिल 2020

उदगीर शहर व तालुक्यातील शेकापूर, तिवटग्याळ, मलकापूर, माळेवाडी, सोमनाथपूर, पिंपरी, नागलगाव आदी भागांत दुपारी तीनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. वादळामुळे शहरातील पोलिस वसाहतीतील एका घरावर झाड कोसळल्याने पोलिस कर्मचाऱ्याची मुलगी किरकोळ जखमी झाली.

उदगीर/जळकोट/रोहिणा (जि.लातूर) : उदगीर शहर व तालुक्यातील शेकापूर, तिवटग्याळ, मलकापूर, माळेवाडी, सोमनाथपूर, पिंपरी, नागलगाव आदी भागांत दुपारी तीनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. वादळामुळे शहरातील पोलिस वसाहतीतील एका घरावर झाड कोसळल्याने पोलिस कर्मचाऱ्याची मुलगी किरकोळ जखमी झाली. आधीच दुरुस्तीअभावी समस्येला तोंड देत असलेल्या या वसाहतीचा धोका वाढला आहे. दरम्यान, तालुक्यातील रावणगाव, बेलसकरगा, तोंडचिर, धोंडीहिप्पर्गा आदी भागात रविवारी जोरदार पाऊस झाला होता.

जळकोट तालुक्यात अर्धा तास पाऊस
जळकोट ः शहर व तालुक्यात सोमवारी (ता. सहा) दुपारी चारच्या सुमारास वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह सुमारे अर्धा तास अवकाळी पाऊस झाला. गहू, हरभऱ्यासह आंब्याचे नुकसान झाले. तालुक्यात दुपारपर्यंत कडक ऊन होते. दुपारी चारच्या सुमारास वातावरण ढगाळ झाले. वारा सुटला. लगेचच विजांच्या कडकडाटासह सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस झाला. हरभरा, गहू शेतातच कापून ठेवलेल्या शेतकऱ्यांची धावपळ उडाली. या पिकांना फटका बसला. यंदा आधीच आंब्याच्या झाडांना अल्प प्रमाणात फळे लागली आहेत. वादळी वाऱ्यामुळे फळांची गळती झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. भुईमूग, उसाला मात्र पावसाचा फायदा झाला आहे.

वाचा ः दोन लाख जणांनी भरले ऑनलाईन वीजबिल, लातुरात परिमंडळातील चित्र

चाकूर तालुक्यात सरी
रोहिणा (ता. चाकूर) ः आंबेवाडी (ता. चाकूर) व परिसरात दुपारी सव्वाचारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह सुमारे २० मिनिटे चांगला पाऊस झाला. कबनसांगवी, उजळंब, रोहिणा, आटोळा, बावलगाव, बोळेगावे, अजनसोंडा येथे हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळल्या. जिल्हा परिषदेच्या आटोळा येथील प्राथमिक केंद्रीय शाळेवरील पत्रे उडाले. याच गावात काही झाडे उन्मळली. पावसामुळे ज्वारीच्या राशी, चिंचा झोडपणे आदी कामांत व्यत्यय येत आहे.

फेसबुकद्वारे अफवेप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा
लातूर : फेसबुकवर चुकीची पोस्ट टाकून अफवा पसरविल्याप्रकरणी एकाविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वैभव राजेंद्र वनारसे (रा. मित्रनगर) असे संशयिताचे नाव आहे. वनारसे याने तबलिगी जमातबाबत आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर टाकली होती. याची दखल घेत पोलिसांनी रविवारी (ता.पाच) ही कारवाई केली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unseasonal Rain Hits Udgir, Jalkot, Rohina