
जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. हवामान खात्याने बुधवार व गुरुवार या दोन दिवसात पावसाचा अंदाज वर्तविला होता.
हिंगोली : जिल्ह्यात मागच्या दोन दिवसापासून वातावरणात बदल झाला असुन गुरुवारी ता. १८ सकाळी कळमनुरी व वसमत तालुक्यातील काही गावात मेघगर्जनेसह पावसाची रिमझिम झाली हिंगोली शहरात देखील मेघगर्जना झाली त्यानंतर ढगाळ वातावरण होते.
जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. हवामान खात्याने बुधवार व गुरुवार या दोन दिवसात पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्याप्रमाणे जिल्ह्यातील काही भागात गुरुवारी सकाळी मेघगर्जनेसह पाऊस झाला. यात वसमत शहरासह गिरगाव, सोमठाणा, पार्डी, आदी गावात पावसाची रिमझिम झाली तसेच कळमनुरी तालुक्यातील बोल्डा, असोला, येहळेगाव, म्हैसगव्हाण आदी ठिकाणी अवकाळी पावसाची रिमझिम झाली. यामुळे गहु, हरभरा पिकांना फटका बसणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
हेही वाचा - हिंगोली जिल्ह्यात कोरोना लसीकरण बहुमाध्यम जनजागृती अभियानास प्रारंभ
यावर्षी नेमकी पिके काढणीस येतांना अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. सोयाबीन, तुर या पिकाच्या काढणीसाठी अडथळा आला आता रब्बीच्या पिकात हरभरा पिक काढणीस आले आहे. अवकाळी पावसाचा फटका या पिकांना बसणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. दोन दिवसापासून दुपारी वातावरणात उष्णता होती. बुधवारपासून सकाळ, सायंकाळी वातावरणात गारवा राहत आहे. सोयाबीन, तुर पिकांचे झालेले नुकसान रब्बीच्या पिकांत भरून निघेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती. मात्र निसर्ग साथ देत नसल्याने त्याचा पिकांच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा गहू, हरभरा या पिकाच्या उत्पन्नावर परिणाम होईल असे शेतकरी सांगत आहेत.
संपादन- प्रल्हाद कांबळे