थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचावर ३३२ मतांनी अविश्वास ठराव मंजूर

अविनाश काळे
Tuesday, 2 February 2021

थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच श्री. सरवदे यांच्याविरुद्ध नऊ सदस्यांनी अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी तहसीलदार संजय पवार यांच्याकडे अर्ज दाखल केला होता.

उमरगा (उस्मानाबाद): ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता काम करणाऱ्या तालुक्यातील सुंदरवाडी येथील सरपंच बालाजी सरवदे यांच्या विरोधात प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने तहसीलदार यांनी घेतलेल्या बैठकीत नऊविरुद्ध एक असा अविश्वासदर्शक ठराव पारित झाला होता. प्रत्यक्षात मतदाराचे मतदान घेण्यासाठी अविश्वासदर्शक बाजूने व विरुद्ध बाजूने मंगळवारी (ता.दोन) जिल्हा परिषदेच्या शाळेत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यात मतदान प्रक्रिया झाली. सरपंचाच्या अविश्वास ठरावाच्या बाजूने ४११, विरोधात ७९ मतदान झाल्याने सरपंच श्री.सरवदे यांच्या विरोधात ३३२ मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाला.

थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच श्री. सरवदे यांच्याविरुद्ध नऊ सदस्यांनी अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी तहसीलदार संजय पवार यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. त्यानुसार पाच जानेवारीला तहसीलदार श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नऊ सदस्यांनी सरपंच श्री. सरवदे यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव पारित झाला होता. मात्र थेट जनतेतून सरपंचाची निवड झाल्याने अविश्वास ठरावासाठी मंगळवारी गावातील नोंदणी केलेल्या मतदारांना बाजुने व विरोधात मतदान करण्याचा हक्क देण्यात आला.  सकाळी साडेआठ ते अकरापर्यत प्रत्यक्ष मतदार नोंदणी केली गेली. ५६० मतदारांची नोंदणी झालेल्या पैकी ५१४ मतदारांनी मतदान केले.

'कोरोनाकाळात सीसीटीव्ही खरेदीत भ्रष्टाचार' आमदार नमिता मुंदडांचा...

मतदानासाठी  दुपारी बारा ते चार पर्यंत मतदानाची वेळ होती. मतपत्रिकेवर अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करण्यासाठी गोल वर्तुळाकार चिन्ह होते तर अविश्वास ठरावाच्या विरोधात मतदान करण्यासाठी त्रिकोण चिन्ह होते. मतपत्रिकेवर फुलीचा शिक्का मारण्याची पद्धत होती त्यात अविश्वास ठरावाच्या बाजूने ४११ तर विरोधात ७९ मतदान झाले. २४ मतपत्रिका बाद ठरल्या. त्यामुळे ३३२ बहुमतांनी सरपंच श्री. सरवदे यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर झाला.

" थेट जनतेतून निवडून दिलेल्या सरपंचाने जबाबदारीने काम करायला हवा. पण सरपंचाने सदस्यांना विश्वासात घेतले नाही आणि नागरिकांचेही कामे वेळेत केली नाहीत. त्यामुळे मतदारांनी मतपेटीतून आपली खदखद व्यक्त करत सरपंचाच्या अविश्वास ठरावावर शिक्कामोर्तब केले. - प्रदिप जाधव, उपसरपंच 

उदगीरात पाच हजारांची लाच घेताना उपकार्यकारी अभियंत्याला रंगेहाथ पकडले

दरम्यान मतदान प्रक्रियेसाठी साठ कर्मचाऱ्यांची नियूक्ती करण्यात आली होती. एकुण चार मतदार केंद्रावर मतदान झाले. अध्याशी अधिकारी म्हणुन तूळजापूरचे गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड यांनी काम पाहिले तर सहाय्यक अध्याशी अधिकारी म्हणुन सहायक गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम, विस्तार अधिकारी पी.एफ. चव्हाण, एन.एस. राठोड यांच्यासह ग्रामसेवक, शिक्षक व कनिष्ठ सहाय्यकांनी निवडणूक प्रक्रियेत काम पाहिले. निकाल जाहिर होताच डॉ.एम. जे. मुल्ला, प्रदिप जाधव, सुरेश जाधव, नितीन जाधव, महादेव खताळ, संतोष गावडे, महेश बनसोडे, युसूफ मुल्ला, दिलीप कांबळे, अशोक बेळंबे, बिरू कठारे आदींनी जल्लोष केला.

" गावातील मतदारांनी मला निवडून दिले. नागरिकांच्या कामासाठी कधीही अडवणूक केली नाही, सदस्यांनी अंतर्गत रोषातुन चूकीचे आरोप करून अविश्वास ठराव आणला आणि लोकामध्ये गैरसमज निर्माण केला. प्रामाणिक प्रयत्न करुनही अन्याय झाला आहे. -बालाजी सरवदे

(edited by- pramod sarawale) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Usmanabad breaking news No confidence motion passed on Sundarwadi sarpanch by 332 votes