esakal | जिंतूरात लसीकरणाचे नियोजन कोलमडले; लसीकरणासाठी गर्दी

बोलून बातमी शोधा

जिंतूर लसीकरण फोटो

जिंतूरात लसीकरणाचे नियोजन कोलमडले; लसीकरणासाठी गर्दी

sakal_logo
By
राजाभाऊ नगरकर.

जिंतूर ( जिल्हा परभणी ) : ग्रामीण रुग्णालयात लसीकरण मोहिमेचे नियोजन व्यवस्थित नसल्यामुळे बुधवारी (ता. २१) लस घेण्यासाठी आलेल्यांनी एकच गर्दी केली. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला असून फक्त १५० नागरिकांना लसीकरण करण्यात आले. तर उर्वरित शेकडो नागरिक, महिला लसीकरणाअभावी परत गेले.

याबाबत समजलेल्या माहितीनुसार बुधवारी रुग्णालयात १५० लसी उपलब्ध झाल्या. त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून बंद असलेले लसीकरण केंद्र पुन्हा सुरु करण्यात आले. शेकडो नागरिकांचा दुसरा डोस घेण्याचा राहिलेला असल्याने प्राप्त साठाही संपला. शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या व लसीकरणाचे महत्त्व लक्षात आल्याने बुधवारी सकाळपासूनच नागरिकांनी लसीकरण केंद्रात लस घेण्यासाठी गर्दी केली होती. सकाळी दहाअकरा वाजेपर्यंत गर्दीचा आकडा पाचशेपर्यंत गेला.

हेही वाचा - नांदेड : पोलिस खिशात असल्याचा आव आणणाऱ्या गुटखा माफियांनी अनुभवली ‘वर्दीची ताकद’

यामध्ये पहिला व दुसरा डोस घेणार्‍या लाभार्थ्यांना स्वतंत्ररित्या डोस देण्याची व्यवस्था नसल्याने शिवाय कोवीशील्डचे फक्त ५० व को-व्हॅक्सीनचे १०० डोस उपलब्ध झाल्यामुळे लाभार्थ्यांमध्ये लस घेण्यासाठी रेटारेटी सुरु झाली. हा प्रकार पाहून वैद्यकीय अधीक्षक डॉ. रविकिरण चांडगे यांनी पोलिसांनाही पाचारण केले परंतु वृद्ध महिला, पुरुषांना तरुण लाभार्थ्यांनी लोटालोटी केल्यामुळे ग्रामीण रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. यात आपला निभाव लागत नसल्याचे दिसून येताच वृद्ध महिला, पुरुषांनी रांगेतून काढता पाय घेतला. तसेच उपलब्ध लसीची संख्या आणि लाभार्थ्यांची संख्या लक्षात घेता उपस्थित सर्वांनाच लसीचा लाभ मिळनार नाही म्हणून अनेकांनी परत जाणेच पसंत केले.

दुसऱ्या डोसवाल्यांची वेगळी व्यवस्था करावी

सध्या ४५ वर्षापुढील नागरिकांना लस देण्यात येत असल्याने तरुणांपुढे जेष्ठांचा रांगेत निभाव लागत नसून उन्हाळ्याच्या तीव्र झळा सोसत तासंतास रांगेत उभे राहणे कठीण होत असल्याने ६० वर्षावरील वृध्दांना दुसऱ्या डोससाठी वेगळी व्यवस्था करण्याची मागणी जेष्ठ नागरिकांतून होत आहे. ग्रामीण रुग्णालयात जानेवारी ते ता. २० एप्रिलपर्यंत एकूण पाच हजार ८८ नागरिकांना लसीकरण करण्यात आले.

संपादन- प्रल्हाद कांबळे