Water Shortage : वैजापूर तालुक्यात दुष्काळाची भीषणता; ११९ टँकरने ८८ गावे, वाड्यांना पाणी

वैजापूर तालुक्यात उन्हाच्या चटक्याबरोबरच टंचाईचा दाह वाढला असून, तब्बल ७८ गावे, १० वाड्यांना ११९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
Water Shortage
Water Shortagesakal

- मोबीन खान

वैजापूर - तालुक्यात उन्हाच्या चटक्याबरोबरच टंचाईचा दाह वाढला असून, तब्बल ७८ गावे, १० वाड्यांना ११९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यासाठी आतापर्यंत १०७ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. अजूनही बरीच गावे, वाड्या वस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. त्यामुळे टँकरचा आकडा या आठवड्यात २०० पार जाण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी पावसाने पाठ फिरवल्याने तालुक्यात भीषण टंचाई जाणवत आहे. प्रमुख दहा छोटे मोठ्या धरणांमध्ये पाणीसाठा शून्य टक्क्यांवर आला आहे. तर दुसरीकडे गावोगावी पाण्याचे स्त्रोत आटल्याने पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. त्यामुळे पाण्यासाठी जनतेला टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.

सद्यस्थितीत तालुक्यांतील १६४ गावांपैकी ७८ गावे, १० वाड्यांना ११९ टँकरने पाणी पुरविण्यात येत आहे. टँकरसोबत प्रशासनाने पाणीपुरवठ्यासाठी १०७ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. दरम्यान, ऊन तापायला सुरवात झाली आहे. चालू महिन्याच्या अखेरीस उन्हाचा कडाका वाढू शकतो.

त्यासोबत ग्रामीण भागात दुष्काळाची परिस्थिती अधिक चिंताजनक होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे प्रशासनाने टंचाई निवारणासाठी बैठक घेणे अपेक्षित होते. परंतु, अद्यापही या बैठकीला मुहूर्त लागला नसल्याने ग्रामीण जनतेला पाण्यासाठी दाहीदिशा फिरावे लागू शकते.

  • टॅँकर सुरू असलेली गावे - ७८

  • टॅँकर सुरू असलेल्या वाड्या, वस्ती - १०

  • खासगी टँकर - ११९

  • अध्रिग्रहीत खासगी विहिरी - १०७

निवडणुकीमुळे प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकसभा निवडणूक येत्या १३ मे रोजी होणार असल्याने तहसील, पंचायत समितीची संपूर्ण यंत्रणा त्यात गुंतून पडली आहे. त्यामुळे तालुक्यातील टंचाईचा मुद्दा बाजूला पडला. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला सर्वाधिक फटका बसत आहे. प्रशासनाने वेळीच लक्ष घालत टंचाई निवारणाकरिता गावागावांत नियोजन करणे आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com