कोरोना समस्येचे निराकरण करण्याची घोषणा देण्याचा मान परभणीच्या वेणुगोपाल सोमाणींना 

गणेश पांडे 
Sunday, 3 January 2021

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने कोरोनावर वापरात येणाऱ्या लसीची घोषणा रविवारी (ता. तीन) केली. यामुळे देशातील नागरिकांना आनंद झाला. परंतु, हा क्षण मराठवाड्यातील विशेषत: परभणीकरांसाठी मोठा विशेष आनंदाचा ठरला. कारण लसीच्या वापराच्या परवानगीची घोषणा करणारे डीसीजीआयचे संचालक डॉ. वेणुगोपाल सोमाणी हे बोरी (ता. जिंतूर, जि. परभणी) येथील रहिवासी आहेत.

परभणी ः ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने कोरोनावर वापरात येणाऱ्या लसीची घोषणा रविवारी (ता. तीन) केली. यामुळे देशातील नागरिकांना आनंद झाला. परंतु, हा क्षण मराठवाड्यातील विशेषत: परभणीकरांसाठी मोठा विशेष आनंदाचा ठरला. कारण लसीच्या वापराच्या परवानगीची घोषणा करणारे डीसीजीआयचे संचालक डॉ. वेणुगोपाल सोमाणी हे बोरी (ता. जिंतूर, जि. परभणी) येथील रहिवासी आहेत. परभणीच्या भूमिपुत्राने देशातील समस्यावर निराकरण करण्याची घोषणा केल्याने हा क्षण परभणीकरांसाठी अभिमानास्पद ठरला आहे. 

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात ‘डीसीजीआय’चे संचालक डॉ. व्ही. जी. सोमाणी (वेणुगोपाल सोमाणी) हे आहेत. ‘डीसीजीआय’ने कोरोना प्रतिबंधात्मक लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली. याची माहिती देण्यासाठी ‘डीसीजीआय’चे संचालक डॉ. व्ही. जी. सोमाणी यांनी सीरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला परवानगी देण्यात आल्याचे जाहीर केले. 

हेही वाचा - परभणी : शिक्षण क्षेत्राला ऊर्जा देणार्‍या डॉ. सुचिता पाटेकर, आधूनिक सावित्रीची लेक

परभणीकरांसाठी सर्वांत आनंदाचा क्षण 
‘डीसीजीआय’ची लस वापरासाठी परवानगी मिळाली असल्याने अवघ्या देशाला याचा आनंद झाला आहे. गेल्या आठ महिन्यांपासून देशातील नागरिक कोरोना महामारीचा त्रास सहन करीत आहे. या परवानगीच्या घोषणेमुळे सर्व देशवासीयामध्ये आनंदाची लहर आली आहे. परंतु, हा आनंद मराठवाड्यातील जनतेसाठी विशेषत: परभणीकरांसाठी सर्वांत आनंदाचा क्षण आहे. कारण या लसीच्या वापराच्या परवानगीची घोषणा करणारे ‘डीसीजीआय’ संचालक व्ही. जी. सोमाणी (वेणुगोपाल सोमाणी) हे परभणी जिल्ह्यातील बोरी या छोट्याशा गावातील मूळचे रहिवासी आहेत. 

हेही वाचा -  परभणीच्या शहर वाहतुक शाखेची उत्कृष्ट कामगिरी, वर्षभरात 54 लाख 51 हजार 950 रुपयांचा दंड वसुल

 

बोरी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण 
त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बोरी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले आहे. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी परभणी शहरात स्थायिक झाले. आजही त्यांचे काका गणेशलाल सोमाणी यांचा बोरीत किराणा व्यवसाय आहे. त्यांचे वडील गिरीधारीलाल सोमाणी हे परभणीत वास्तव्य करतात. डॉ. वेणुगोपाल सोमाणी यांचे उच्चशिक्षण नागपूर येथे झाले. त्यानंतर त्यांनी सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन यांच्यासोबत काम सुरू केले. सुरवातील ड्रग्स इन्स्पेक्टर म्हणून नियुक्त झालेले डॉ. वेणुगोपाल सोमाणी हे ‘डीसीजीआय’ पदावर पोचले. धोरण तयार करणे, प्रशिक्षण, निवड प्रक्रिया, नियामक प्रक्रियेसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करत आहेत. ज्या कोरोना महामारीमुळे अवघा देश संकटात आहे. त्या कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी बनविण्यात आलेल्या लसीला वापराची परवानगी देण्याचे मोठे काम परभणीच्या भूमिपुत्राने केले याचा परभणीकरांना सार्थ अभिमान आहे. 

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Venugopal Somani of Parbhani is honored to announce the solution to the Corona problem, Parbhani News