व्हिडिओ : बँक-ग्राहकसेवा केंद्रावर हाऊस फुल्ल गर्दी

शिवचरण वावळे
बुधवार, 8 एप्रिल 2020

‘कोरोना’ व्हायरस किती गंभीर आहे याची रोज वाढणाऱ्या आकेवारीवरुन स्पस्ट दिसून येत आहे. या गंभीर आजाराला हरवणे शक्य आहे, पण ते घरात राहुनच.  मात्र अनेकांना घरा बसवत नाही म्हणून विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांची संख्या पोलीस आणि आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे. 

नांदेड : सध्या रुग्णालये, औषधी दुकाने, किराणादुकान अशा अत्यावश्यक सेवा तेवढ्या सुरु आहेत. त्यात बँकांच्या खात्यामध्ये जनधनच्या खाते, ज्येंष्ठांची पेन्शन व काही शासकीय कर्मचारी यांचे वेतन जमा झाल्याने विविध ठिकाणाच्या बँकेत पैसे काढण्याकरीता आलेल्या ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. विशेष म्हणजे सोशल डिस्टन्सिंग बद्दल हे ग्राहक अनभिज्ञ असून त्यांना तसे अंतर ठेवण्यास कुणीच काही सांगत नाही. त्यामुळे पैसे काढण्यासाठी आलेले ग्राहक, खातेधारक दाटीवाटीने रांगेत उभे रहात असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. जनधन खात्यात जमा झालेले ५०० रुपये काढले नाही तर ते पुन्हा सरकार परत पैसे काढुन घेईल अशी भिती खातेधारकांना वाटत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन खात्यावर पुढील तीन महिण्यासाठी जनधन खात्यावर ५०० रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सर्वांना बँकेकडून खात्यावरुन पैसे काढण्यासाठी मेसेजद्वारे कळविण्यात येत आहे. मात्र अनेक ग्राहक मेसेज न बघताच बँकेत विचारपूस करण्यासाठी गर्दी करत आहेत. महिलांच्या नावे जनधन खाते असल्याने खात्यातुन पैसे काढण्यासाठी महिला ग्राहकांची बँकेत गर्दी होत आहे. 

हेही वाचा- भीमजयंती घरातच साजरी करा- भन्ते पय्यांबोधी

बँकेत सोशल डिस्टन्स हवे-
शहरातील बँकामध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या बाबतीत कुठलीही खबरदारी घेतली जात नसल्याचे उघड झाले आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव झपाट्याने वाढत आहे. दरम्यान शासनाने सोशल डिस्टन्स सक्तीचे केले आहे. इतकेच नव्हे तर, दोन व्यक्तीमध्ये समान अंतर राहावे यासाठी शासकीय, खासगी व इतर ठिकाणी एकत्र येणाऱ्या लॉकडाऊन केले आहे. शेकडो कर्मचारी घरी बसून आहेत. बँकामध्ये सोशल डिस्टन्स पाळले जावे म्हणून काही अंतर सोडुन पांढऱ्या रंगाच्या पट्या ओढुन दोन व्यक्तीमध्ये समांतर अंतर ठेवण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे काही बँकेत सुरळीत काम सुरु असल्याचे दिसून येत आहे.

दुसरीकडे मात्र काही खासगी बँकांनी सोशल डिस्टन्सची कुठलीही खबरदारी घेतली जात नसल्यामुळे बँकेत येणारे ग्राहक खातेधारकांची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे शासनाच्या सोशल डिस्टन्सचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. पोलीस यंत्रणा तोकडी असल्यामुळे पोलिस शहराच्या मुख्य चौकात थांबुन लोकांना घरी बसण्याचे आवाहन करत आहेत. तर दुसरीकडे मात्र बँकेत गर्दी होत असताना देखील पोलीस अधिकारी त्या गर्दीकडे काना डोळा करताना दिसून येत आहेत.

हेही वाचले पाहिजे- नांदेडकरांचे सहाय्यता निधीत ४१ लाखांचे योगदान

बँक परिसरात सावली- पाणी नाही
बँकेत पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांना अक्षरशः तळपत्या उन्हात उभे टाकावे लागत आहे. उन्हाचा मारा सहन होत नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरीक बँकेजवळ सावलीच्या शोधात एकत्र येत आहेत. शिवाय बँक परिसरात पिण्याच्या पाण्याची कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे पैसे काढण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना न दिसणाऱ्या‘कोरोना’ व्हायरससोबतच इतरही संकटांचा सामना करावा लागत आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Video: House-Crowded Crowd At Bank-Customer Service Center Nanded News