व्हिडीओ ; येलदरीच्या दहा, सिध्देश्वरच्या आठ तर दुधनाच्या बारा दरवाजातून मोठा विसर्ग 

सकाळ वृतसेवा 
Monday, 21 September 2020

जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणासमोरील रस्त्याने एक-दीड फूट पुराचे पाणी वाहत असल्याने साडेअकराच्या सुमारास नदी पलीकडील गावांची तसेच विदर्भाकडे जाणारी जिंतूर-सेनगाव राज्यमार्गावरील वाहतूक ठप्प झाली. येलदरी धरणाचे दहाही दरवाजे एक मीटरने उघडले आहेत. तर सेलू-देवगावफाटा रस्त्यावरील मोरेगाव येथील दूधना नदी पात्रालगत पाण्याचा विसर्ग होत आहे.

जिंतूर : सोमवारी (ता.२१) येलदरी धरणाचे दहाही दरवाजे प्रत्येकी एक मीटरने उघडण्यात येऊन सुमारे ४४ हजार क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला. त्यामुळे धरणासमोरील एक-दीड फूट पुराचे पाणी वाहत असल्याने साडेअकराच्या सुमारास या मार्गावरून नदी पलीकडील गावांची तसेच विदर्भाकडे जाणारी जिंतूर-सेनगाव राज्यमार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे.

औंढा नागनाथ तालुक्यातील सिध्देश्वर धरणाचे आठ गेट उघडून पुर्णा नदीपात्रात ३२ हजार २७९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोमवारी (ता.२१) सकाळी सात वाजता करण्यात आला. तसेच सेलू तालुक्यातील लोअर दुधना प्रकल्प धरणाच्या दूधना नदीपात्रात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने सोमवारी (ता.२१) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास आणखीन सहा दरवाजातुन परत सात हजार २०८  क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले. 

सिध्देश्वरमधून ३२ हजार २७९ क्युसेक पाण्याचा विसर्ग 
हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील सिध्देश्वर धरणाचे आठ गेट उघडून पुर्णा नदीपात्रात ३२ हजार २७९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोमवारी (ता.२१) सकाळी सात वाजता करण्यात आला. औंढा तालुक्यातील सिध्देश्वर धरणात येलदरी धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. पावसाने येलदरी धरणात पाण्याची आवक सुरु असल्याने धरण शंभर टक्के भरल्याने यातून सिध्देश्वर धरणात पाण्याची आवक सुरू आहे. रविवारी धरणाचे सहा गेट उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सोमवारी देखील आठ गेट उघडून पुर्णा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे सिध्देश्वर धरण देखील शंभर टक्के भरले आहे.  सोमवारी सकाळी सिध्देश्वर धरणाचे आठ गेट उघडून त्यातून ३२ हजार २७९ क्युसेक पाणी पुर्णा नदीच्या पात्रात सोडण्यात आले. यामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. 

हेही वाचा - हिंगोली : पूल नसल्याने ग्रामस्थ व शेतकऱ्यांना काढावी लागते पाण्यातून वाट

नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
सिध्देश्वर धरणाचे गेट नंबर दोन, चार, सहा, सात, आठ, नऊ, अकरा, तेरा हे उघडले आहेत. त्यातून पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे पुर्णा नदीला पुर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे नदी काठावर असलेल्या गावांना पुर नियंत्रण कक्षातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला. यावर्षी आतापर्यंत पाच वेळेस या धरणातून पुर्णा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. यामुळे या भागातील विहीर व विंधन विहिरीची पाणीपातळी कमालीची वाढली आहे. दरम्यान, येलदरी धरणाचे दहा गेट उघडून ते पाणी देखील पुर्णा नदी पात्रात सोडण्यात येत असल्याने नदी काठावरील गावकऱ्यांनी सावध राहावे असे पुर नियंत्रण कक्षातर्फे कळविले आहे. हिच स्थिती परभणीसह हिंगोली जिल्ह्यातील सर्वच नदीकाठच्या गावांच्या बाबतीत प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.    

हेही वाचा - पावसाळ्यापुर्वीची थातुरमातुर कामे पथ्यावर, बारा-बारा तास वीज गुल...

दुधना धरणाचे बारा दरवाजे उघडले ; सतरा हजार क्युसेसने विसर्ग
सेलू ः तालुक्यातील लोअर दुधना प्रकल्प धरणाच्या दूधना नदीपात्रात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने रविवारी (ता.२०) धरणातुन दुधना नदीपात्रात सहा दरवाजातुन दहा हजार ७७६ कूसेक्स पाणी सोडण्यात आले होते. पाण्याची आवक वाढत असल्याने सोमवारी (ता.२१) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास आणखीन सहा दरवाजातुन परत सात हजार २०८  क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले. असे एकुण बारा दरवाजातुन दुधना नदीपात्रात एकुण सतरा हजार ९८५ क्युसेक्सने पाणी सोडण्यात आल्याने हादगाव - केदारवाकडी, सेलू - मोरेगाव, राजेवाडी -वालुर, मानवत रोड -वालुर रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले असून यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

 

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Video; Large discharge through ten gates of Yeldari, eight gates of Siddheshwar and twelve gates of Dudhana, Parbhani News